नाव कमावलं; जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला मुलगा झाला आयएएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 07:02 PM2020-08-05T19:02:34+5:302020-08-05T19:05:14+5:30
पंढरपूर तालुक्यातील खर्डीचा राहुल चव्हाणने मिळविली दुसºया प्रयत्नात १०९ वी रँक
पंढरपूर : खर्डी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील राहुल लक्ष्मण चव्हाण याने दुसºया प्रयत्नात १०९ वी रॅँक घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.
शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण रामचंद्र चव्हाण व नंदा लक्ष्मण चव्हाण या दाम्पत्याचे राहुल हे दुसरे अपत्य. त्यांना एकूण तीन अपत्ये असून, आधुनिक शेतीबरोबर तिन्ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले आहे. थोरला मुलगा कल्याण हा कृषी पदवीधर आहे, तर लहान मुलगी विद्या ही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्नशील आहे.
राहुलचे प्राथमिक शिक्षण खर्डी येथील झेडपी शाळेत, माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील द. ह. कवठेकर प्रशालेत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी वाडिया कॉलेज, पुणे येथून कला शाखेची भूगोल विषयात पदवी घेतली. लहानपणापासून उच्च शिक्षित अधिकारी होण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यानुसार ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांनी पुणे व दिल्ली येथे अभ्यास केला. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
——
कौटुंबिक पार्श्वभूमी
राहुलचे वडील लक्ष्मण रामचंद्र चव्हाण हे अतिशय गरीब. स्वकर्तृत्वावर त्यांनी अत्याधुनिक शेतीचा आधार घेत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले. ते स्वत: द्राक्ष बागायतदार असून, त्यांनी सुधारित शेतीसाठी थोरला मुलगा कृषी पदवीधर बनविला. वडिलांचे शिक्षण नववीपर्यंत झाले असून, आईचे प्राथमिकपर्यंतच शिक्षण झाले आहे. त्यांच्या कुटुंबात यापूर्वी पदवीपर्यंत शिक्षण झालेले कोणीही नाही. राहुलची लहान बहीण विद्या ही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्नशील आहे. तर ज्येष्ठ बंधू कल्याण चव्हाण हा कृषी पदवी घेऊन शेती करत आहे.