खडी साखर समजून खाल्ला कॉस्टिक सोडा; नऊ वर्षाच्या नवीनवर रुग्णालयात उपचार
By रवींद्र देशमुख | Published: December 30, 2023 06:41 PM2023-12-30T18:41:58+5:302023-12-30T18:43:01+5:30
छोट्या डब्यातील खडे पाहून त्याला ती खडीसाखर असल्याचे वाटले आणि त्याने ती तोंडात टाकली. काही वेळानं त्याला त्रास जाणवायला लागला.
सोलापूर : आरोग्याला अपायकारक असणाऱ्या वस्तू लहान मुलांपासून दूर नाही ठेवल्यातर त्याचे गंभीर परिणाम उद्भवतात. अशीच एक घटना सोलापुरातील गवळी वस्तीमध्ये घडली. नऊ वर्षाच्या मुलानं खडीसाखर समजून कॉस्टिक सोडा खाल्यानं त्याला दवाखान्यात दाखल करावं लागलं. नवीन राकेश वरम (रा. गवळी वस्ती, सोलापूर) असं या मुलाचं नाव आहे. यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला नवीन शुक्रवारच्या रात्री घरामध्ये सर्व नातलगांसमवेत बसलेला होता. काहीतरी खाण्याची हुक्की झाल्यानं त्यानं घरातील कॉस्टिक सोड्याच्या छोट्या डब्यातील खडे पाहून त्याला ती खडीसाखर असल्याचे वाटले आणि त्याने ती तोंडात टाकली. काही वेळानं त्याला त्रास जाणवायला लागला.
नातलगांनी त्याला विचारणा केली असता त्याने खडी साखरेचा खडा खाल्ला असल्याचे सांगितले. मात्र तो खडीसाखरेचा खडा नसून, कॉस्टिक सोडा असल्याचे नातलगांच्या लक्षात आले. वडील राकेश यांनी नवीनला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला लागलीच उपचार सुरु केले. त्याची प्रकृती स्थिर असून, तो शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले.