बाप्पा अन् लक्ष्मीच्या सजावटीसाठी माटीगाडाची इकोफ्रेंडली फळे सोलापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:26 PM2019-08-23T15:26:14+5:302019-08-23T15:29:44+5:30
प्रत्यक्ष फळांपेक्षाही आकर्षक; पश्चिम बंगालमधील मातीची भांडी बनविण्यासाठी प्रसिद्ध गाव
यशवंत सादूल
सोलापूर : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्ह्यातील माटीगाडा हे गाव मातीच्या सर्व वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण गावातील घराघरांत अशा मातीच्या वस्तू, खेळणी, फळे, शोभेच्या मूर्ती, वॉल पीस, विविध कलात्मक वस्तू येथे बनविल्या जातात.
सोलापुरातील भाविकांना काहीतरी वेगळे द्यायचे या उद्देशाने ही फळे सोलापुरात भीमण्णा जाधव यांनी आणले आहेत. यामध्ये लक्ष्मी व गणपतीच्या सजावटीसाठी सिलीगुडी येथून मातीच्या रंगीबेरंगी फळे, भाज्या, शोभेच्या मूर्ती, घंटी आणल्या आहेत. या सर्व वस्तूंमध्ये इतके साम्य आहे की, प्रत्यक्ष फळे आणि या मातीच्या फळांमधील फरक हाताने स्पर्श करून पाहिल्याशिवाय कळणार नाही.
हुबेहूब दिसणाºया या वस्तूंची रंगसंगतीसुद्धा संभ्रमात टाकणारी आहे. ही फळे घेण्यासाठी ग्राहक जुनी फौजदार चावडीजवळील भीमण्णा जाधव बंधूंच्या स्टॉलवर हजेरी लावून उत्सुकतेने चौकशी करत आहेत. काही ग्राहक टोपल्यातील कांदे, लसूण पाहून कसे किलो आहेत, असे विचारताना दिसून आले. बाप्पा, लक्ष्मीसमोर आरास, शोभेसाठी ठेवण्यात येणारी ही मातीची फळे आहेत, असे सांगितल्यावर मात्र ग्राहक त्यांना स्पर्श करून फळे, वस्तू न्याहाळताना दिसून येत आहेत. त्यांची रंगसंगतीही मिळतीजुळती आहे.
इकोफ्रेंडली फळे अन् वस्तू़...
- सीताफळ, संत्रा, पेरू, आंबा, सफरचंद, पपई, डाळिंब, कैरी, आवळा, केळी, कांदा, लसूण, दोडका, वांगी, काकडी, तोंडले, कारले, कोबी, टोमॅटोे यांसह गायवासरू, वाºयासह हलणारी घंटी, गणपती मूर्ती, राधाकृष्ण मूर्ती, हत्ती, उंट, शेठाणी, फुलदाणी, कालिकादेवी मूर्ती, वॉल पीस, बदक व बुद्ध मूर्ती अशा विविध प्रकारच्या आकर्षक रंगसंगतीच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. अगदी नाममात्र दहा ते पंधरा रुपये एका फळाची किंमत आहे, असे गायत्री जाधव यांनी सांगितले.
भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सिलीगुडी येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण भारतातील मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाºया सिलीगुडीजवळ असलेल्या माटीगाडा या गावाला भेट देऊन त्यांची ही कला पाहून भारावून गेलो. पाण्यात सहज विरघळणाºया इकोफ्रेंडली वस्तू यंदाच्या उत्सवात सोलापूरकरांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- भीमण्णा जाधव, सुंद्रीवादक