सोलापूरपर्यंत पोहोचली ED, चौथ्या चौकशीनंतर संबंधितांना होऊ शकते अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:53 AM2022-04-04T07:53:33+5:302022-04-04T07:54:15+5:30
सोलापूर/टेंभुर्णी : माढा तालुक्यातील साखर कारखान्यात व सूतगिरणीच्या खरेदी व्यवहारात झालेल्या आर्थिक उलाढालीची ईडीमार्फत तीन वेळा चौकशी झाली. चौथ्या ...
सोलापूर/टेंभुर्णी : माढा तालुक्यातील साखर कारखान्यात व सूतगिरणीच्या खरेदी व्यवहारात झालेल्या आर्थिक उलाढालीची ईडीमार्फत तीन वेळा चौकशी झाली. चौथ्या चौकशीनंतर संबंधितांना गजाआड व्हावे लागेल, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत ‘लोकमत’शी बोलताना संजय कोकाटे म्हणाले, तालुक्यात जास्त उसाची उपलब्धता पाहून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स इंडी (कर्नाटक) येथील साखर कारखाना, परांडा डिस्टिलरी हे खाजगी उद्योग उभारण्यासाठी गोळा केले आहेत. या खाजगी संस्था चालवीत असताना शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक व आयडीबीआय बँक या सर्व बँकांच्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाखांमधून शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप कोकाटे यांनी केला आहे. ते कर्ज एक तर कर्जमाफीमध्ये बसविले आहे किंवा वन टाइम सेटलमेंट स्कीममध्ये बसवून आर्थिक फायदा घेतला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सिबील स्कोअर खराब झाले आहे. याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ईडीकडे केल्याचे काेकाटे यांनी म्हटले आहे. त्यानुसार आमदार बबनराव शिंदे व रणजितसिंह शिंदे यांची १५ डिसेंबर २०२१, २२ फेब्रुवारी २०२२ आणि १ एप्रिल २०२२ अशी तीन वेळा चौकशी प्रक्रिया राबविली गेली आहे.
उच्च न्यायालयातही जाणार
उपळाई येथील नागनाथ कदम यांनीही वस्त्रोद्योग महामंडळाचे २२ कोटी देणे असताना माढा येथील जगदंबा सूत गिरणीची बेकायदेशीर खरेदी झाल्याबद्दल ईडीकडे तक्रार केल्याचे कोकाटे यांनी सांगितले. या सर्व प्रकरणातील शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रसंगी आम्ही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे कोकाटे म्हणाले.