कायद्याचे ज्ञान संपादन करा

By admin | Published: July 13, 2014 01:28 AM2014-07-13T01:28:00+5:302014-07-13T01:28:00+5:30

पत्रकारांची कार्यशाळा: अश्विनकुमार देवरे यांचे आवाहन

Edit the knowledge of law | कायद्याचे ज्ञान संपादन करा

कायद्याचे ज्ञान संपादन करा

Next


सोलापूर : प्रसारमाध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, याची क्षितिजे विस्तारली आहेत. दैनंदिन घटना, घडामोडींच्या बातम्या देत असताना पत्रकारांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी समाजाची न्यायिक भावना निर्माण केली पाहिजे. शिवाय कायद्याचे ज्ञान घेतले पाहिजे, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने हेरिटेज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत अश्विनकुमार देवरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी, लोकमंगलचे संस्थापक सुभाष देशमुख, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
पत्रकारांना मार्गदर्शन करताना अश्विनकुमार देवरे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये दररोज अनेक बातम्या येत असतात. गुन्हेगारीविषयक आलेल्या बातम्या वाचताना पत्रकारांना कायद्याच्या ज्ञानाचा अभाव असल्याचे दिसून येते. कोणताही आरोपी जेव्हा न्यायालयत आणला जातो तेव्हा तो निर्दोष आहे, असेच गृहीत धरावे लागते. जिथे साक्षी-पुरावे मिळत नाहीत तिथे पोलीस हतबल होतात आणि न्यायालयाला आरोपीस जामीन मंजूर करावा लागतो.
न्यायालयाच्या अशा निकालावर प्रसारमाध्यमांकडून वेगळ्या पद्धतीने वार्तांकन केले जाते. पत्रकारांनी न्यायालयातील सत्यस्थिती जरूर मांडावी; मात्र न्यायव्यवस्थेवर अन्याय होईल, अशी बाजू समाजासमोर मांडू नये. यामुळे समाजाचे हित होत नाही. पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने वार्तांकन करावे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले हक्क आहेत, त्याचा वापर केल्यास आरोपीला शिक्षा आणि निर्दोषाला न्याय मिळण्यास वेळ लागत नाही. ही स्थिती निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी समाजाचे धैर्य वाढविण्याची आणि त्यांची मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे, असेही शेवटी जिल्हा न्यायाधीश अश्विनकुमार देवरे यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी म्हणाले की, सोलापूरच्या पत्रकारितेला चांगला इतिहास आहे. आज पत्रकारितेचे स्वरूप पाहिले तर याची व्यापकता वाढली आहे.
समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही पत्रकारिता कशी समृद्ध होईल, याचा विचार पत्रकारांनी केला पाहिजे. पत्रकारितेची परंपरा अशीच कायम रहावी, अशी भावना अहंकारी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तडवळकर यांनी केले तर आभार विजयकुमार देशपांडे यांनी मानले.
-----------------------
विधिमंडळ कामकाज, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर मार्गदर्शन
विरोधी पक्षांची धार कमी होतेय : जोशी
विधानसभेत विरोधी पक्ष जितक्या आक्रमकतेने जनतेचे प्रश्न मांडतो त्यावर त्याची तड लागते; पण गेल्या २० वर्षांचे राजकारण पाहिले तर अलीकडच्या काळात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे ओळखणे कठीण होत आहे. विधानसभेतील प्रश्नोत्तरे व लक्षवेधी महत्त्वाची असतात. प्रश्नोत्तरासाठी सदस्याला एक महिन्यापूर्वी प्रश्न पाठवावा लागतो तर लक्षवेधीमध्ये तातडीचा विषय तीन दिवसांत घेता येतो. लक्षवेधी सत्ताधारी व विरोधकांनाही मांडता येते. त्यावर संबंधित खात्याच्या मंत्र्याचे लेखी उत्तर असते, असे पत्रकार यदु जोशी यांनी सांगितले.
प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहावे: घटवाई
समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. पूर्वी पत्रकारितेला प्रिंट मीडियामध्ये वाव होता. आता मीडियाने व्यापक स्वरूप धारण केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये सध्या मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही एखादी घटना घडली की, ती तत्काळ इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या पाहायला मिळत आहे. रिपोर्टर हा बातमी तयार करताना दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत असतो, असे पत्रकार सुहास घटवाई यांनी सांगितले.
----------------------------------
विषयावर संशोधन करा
विजय चोरमारे यांनी ग्रामीण पत्रकारांना विषय संशोधक पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. अनेक विषय असतात, त्याचा बारकाईने अभ्यास करून मुद्दे मांडता आले पाहिजेत; पण अलीकडे ग्रामीण वार्ताहर पोलीस ठाणे व राजकीय बातम्यांना अधिक महत्त्व देताना आढळतात. खरी पत्रकारिता करावयाची असेल तर बीटच्या पलीकडचे जग पाहा, असा त्यांनी सल्ला दिला.

Web Title: Edit the knowledge of law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.