शिक्षण एके शिक्षण, शिक्षण दुणे शिक्षण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:06 AM2020-07-14T11:06:09+5:302020-07-14T11:08:10+5:30
लॉकडाऊनचा काळ असूनसुद्धा एकेका दुकानात १ हजाराहून अधिक मोबाईलची विक्री झाल्याचे दिसून आले.
कोविड-१९ ने अभूतपूर्वरित्या सर्वच क्षेत्रात प्रवेश केला. शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. परिस्थितीला उत्तर देण्यासाठी पूरक म्हणून वापरले जाणारे आॅनलाईन शिक्षण मुख्य प्रवाहात आले. अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञांनी केलेल्या शिक्षणाच्या व्याख्यांचा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली. शिक्षण हे अमर्याद आहे. शिक्षणाची निश्चित अशी परिपूर्ण व्याख्या करणे अशक्यच! शिक्षण घेण्यासाठी पंचेद्रियांच्या योग्य वापरानुसार त्यांच्या क्षमतेनुसार अनुभूती दिल्या जातात. जेणेकरुन तो अनुभव त्याच्या दीर्घकाळ स्मरणात राहावा. शिक्षणातील पंचेद्रियांचा वापर आॅनलाईन शिक्षणाच्या कोणत्या कप्प्यात होणार?
शिक्षण हे मन,मेंदू, शरीर बळकट करण्यासाठी असायला हवंय, आॅनलाईन शिक्षणाने ही बळकटी कशी आणता येईल ? वर्गातच विद्यार्थी शिकतो ही केवळ कल्पना आहे. मुलं कुठंही शिकतातच त्याला कोणतीच मर्यादा नाही. आॅनलाईन शिक्षण काळाची गरज म्हणून आपण स्वीकारलीच आहे. जिथं सर्व शिक्षक टेक्नोसेव्ही नसताना खूप कष्ट करून एखादा व्हिडिओ तयार करतात.टेस्ट तयार करतात; मात्र त्याला मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता, आॅनलाईन शिक्षण चालू आहे हे म्हणणं फार धाडसाचंच होईल.
सर्व पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील हे कशाच्या आधारावर गृहित धरलं गेलं ? सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध होतीलच हे कसे मानले? तरीही आॅनलाईन शिक्षण सुरू केले.पालकांकडे त्यांच्याच कामासाठी मोबाईल्स असणार ते त्यांच्या मुलांना कितपत देत असतील किंवा देऊ शकतील त्यामध्ये हाही महत्त्वाचा प्रश्न.
दैनंदिन जीवनात मोबाईल ही महत्त्वाची गरज झाली आहे. त्यातून मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईल घेणे अपरिहार्य झाल्याने इतक्या कठीण परिस्थितीतही मोबाईलची खरेदी हा भार पालकांवर पडलाच... होणारा परिणाम म्हणजे मोबाईलच्या खरेदीत प्रचंड वाढ झाली.
लॉकडाऊनचा काळ असूनसुद्धा एकेका दुकानात १ हजाराहून अधिक मोबाईलची विक्री झाल्याचे दिसून आले. वर्षा-दोन वर्षांचा धंदा २-३ महिन्यात झाला. पण याचा अर्थ प्रत्येक पालकाकडे-विद्यार्थ्यांकडे मोबाईलची उपलब्धता झालीच असे म्हणता येत नाही. त्यात पुन्हा हायस्पीड डाटाचा वेगळाच खर्च !
शहरी भागातील नोकरदारांसाठी श्वासाइतकंच महत्त्वाचं असलेलं गॅझेट, आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील लोकांना हे गॅझेट्स वगैरे रोजच्या बाजारहाटाप्रमाणे खरेदी करण्यासारख्या गोष्टी असल्या म्हणून त्यांच्या मुलांचं आॅनलाईन शिक्षण योग्य प्रकारे होत आहे असे म्हणणे देखील अशक्यच आहे. शिक्षकांपेक्षा,पालकांपेक्षा मुलं अनेक गॅझेट्सचा वापर सहज करताना दिसतात, पण त्यांचा शालेय शिक्षणासाठीच उपयोग करतील अशी खात्री देता येणार नाही.
अनेक लिंक्स मुलांना दिसणार, मुलं उत्सुकतेने त्या लिंक्स ओपन करणार, मग त्यांना काय काय पाहावे लागणार याची कल्पनाच न केलेली बरी. आॅनलाईन शिक्षण घेता घेता मुलं अनेक गोष्टींना बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी काही नियम,अलर्टस् मुलांनाही आणि पालकांनाही माहीत व्हायला हव्यात. पण धोके माहीत असूनही बळी पडणाºयांची संख्या जास्त असू शकते. आपली मुलं गॅझेट्स घेऊन काय काय करत असतील याची पालकांना कितपत माहिती असू शकेल? मुलांचा स्क्रीन टाइम किती वाढला आहे. त्याचा नेमका परिणाम मुलांच्या शरीरावर, मानसिकतेवर काय होतोय याचाही विचार आॅनलाईन शिक्षण घेताना अत्यावश्यक वाटते. म्हणजे याचा वापर किती टक्के करावा, शिकण्यात याला काहीतरी मर्यादा हवीच.
मेंदू अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या म्हणण्यानुसार ‘एकूणच शिकणे-शिकवणे या प्रक्रियेत गॅझेट्सचा वापर १० टक्के असावा.’ म्हणजे पंचपक्वानातील ताटात असलेले लोणचेच! इतकंच महत्त्व असावं खरं तर आॅनलाईन शिक्षणाला. त्यातही संविधानाला अनुसरून शिकण्यासाठीचा आशय असणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे संविधानिक मूल्यांची जपणूक होईल असाच आशय असेल तरच त्या शिक्षणाला अर्थ असेल. हे कसे समजणार पालकांना, मुलांना? रोज फेसबुकवर,व्हॉट्सअॅपवर ज्ञान- अज्ञानाचे रतीब घालणे सुरू असते, अशावेळी यावर उपाय म्हणून जास्तवेळ मोबाईल मुलांकडे राहणार नाही या पद्धतीने अभ्यासाचे नियोजन करणे कस शक्य आहे हे पाहायला हवे.
- सरिता फडके,
(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)