कोरोना लॉकडाऊनचा परिणाम; पती बेरोजगार झाल्याने पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:36 PM2020-08-03T12:36:05+5:302020-08-03T12:39:42+5:30
सोलापुरातील धक्कादायक घटना; सन्मान झालेल्या फेट्याने पत्नीचा शेवट झाला
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहर लॉक झाले. चार-सव्वाचार महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये मार्केट यार्डात हमालीचे कामही थांबले. पतीच्या जीवावर कसाबसा चालणारा संसाराचा गाडाही थांबला. काहीतरी करावं याचा विचार करून अन् संसाराचा गाडा हाकण्याचं स्वप्न रंगवणाºया सपनाने हॉस्पिटलमध्ये नोकरीही पत्करली. तेथे मिळणाºया वेतनावरही घर चालेना. आपलं स्वप्न अंधूक होत असल्याची जाणीव होत होती. त्यातच सपनाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला.
सपना निर्मल कांबळे (वय ३५, रा. न्यू बुधवार पेठ, सम्राट अशोक चौक) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. तिचा पती निर्मल हा रोजच्या रोज मार्केट यार्डातील मिळेल ते हमालीचे काम करून आपले घर चालवत होता. लॉकडाऊनमुळे हाताचे कामही गेले अन् तो घरीच बसून राहिला. त्यातच त्याला दोन मुली अन् एक मुलगा. त्यांच्या पोटापाण्याबरोबर शिक्षणाची चिंता निर्मलसह सपनालाही लागून राहिली. चिंतेने अस्वस्थ झालेली सपना हिने एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करुन संसाराला बळ देण्याचा निर्णय घेतला.
किमान तेथे मिळणाºया वेतनातून रोजचा खर्च भागेल आणि पतीला काम मिळेपर्यंत थोडा त्रास होईल हा विचार करुन सपनाने तेथे इमानेइतबारे ड्यूटी सुरू केली. १५ दिवसांपूर्वीच तिने हॉस्पिटलमधील नोकरी पत्करली होती. मिळणाºया वेतनातही खर्च भागेना. या चिंतेने आधीच्या चिंतेत भरच पडली. काय करावं अन् काही नाही, हे तिला समजेना. मुलाबाळाचं काळवंडलेले चेहरेही तिला पाहवत नव्हते. तिच्या मनात आत्महत्येचे विचार अधिक घट्ट होऊ लागले. शनिवारी मध्यरात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सन्मान झालेल्या फेट्याने पत्नीचा शेवट झाला
पती निर्मल यांचा सामाजिक कार्यक्रमादरम्यान बºयाचवेळा फेटा बांधून सत्कार झाला होता. सत्कार झालेले फेटे त्यांनी घरात ठेवले होते; मात्र त्याच फेट्याने पत्नी सपना हिने गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केला.