अतिवृष्टीचा परिणाम; द्राक्ष, डाळिंब निर्यातीत सोलापूर यंदा शुन्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 03:48 PM2021-02-27T15:48:30+5:302021-02-27T15:48:49+5:30
डाळिंबासाठी मार्च, एप्रिलपर्यंत संधी
अरूण बारसकर
सोलापूर: उत्पादनवाढीसह निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब उत्पादनात आघाडी घेतलेला सोलापूर जिल्हा यंदा निर्यातीत शुन्यावर आहे. संततधार व अतिवृष्टीमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातून द्राक्ष, डाळिंब, केळीची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत ९ कंटेनरमधून १२० मेट्रिक टन द्राक्ष, तर १२६ कंटेनरमधून १७४३ मेट्रिक टन डाळिंब निर्यात झाले होते. २०१९मध्ये १४ कंटेनरमधून १८३.७७ मेट्रिक टन डाळिंब निर्यात झाले होते. यावर्षी डाळिंबाचा अवघा एक कंटेनर, तर दोन कंटेनरमधून ३२००० रोपांची निर्यात झाली आहे. केळी ११४ कंटेनरमधून २३०२ मेट्रिक टन निर्यात झाली आहे.
द्राक्ष निर्यातीत नाशिकच...
राज्यातील सोलापूरसह आठ जिल्ह्यातून यावर्षी निर्यातीसाठी नोंद झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यातून एकही कंटेनर इतर देशात गेला नाही. नाशिक जिल्ह्यातून ३६ हजार ७२ मेट्रिक टन, सांगली १६७० मेट्रिक टन, सातारा ९५९ मेट्रिक टन, पुणे ११४, अहमदनगर ५३, तर उस्मानाबादमधून ४० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. एकट्या जर्मनीत ३१०७ मेट्रिक टन, नेदरलॅंड २७२६ मेट्रिक टन, युको ५७२० मेट्रिक टन, तर ग्रीस, कॅनडा, स्पेन, हाॅलंड आदी देशात द्राक्ष निर्यात झाली आहेत.
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात
उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने फलधारणा व गुणवत्तेवर परिणाम झाला असावा. यामुळे सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत द्राक्ष व डाळिंबाची निर्यात झाली नाही. एप्रिलपर्यंत डाळिंब निर्यातीला संधी आहे.
- गोविंद हांडे
राज्य निर्यात सल्लागार