वाढत्या उन्हाचा परिणाम; शहरातील साफसफाईच्या वेळेत बदल
By Appasaheb.patil | Published: March 3, 2023 04:50 PM2023-03-03T16:50:46+5:302023-03-03T16:51:01+5:30
शहरातील वाढत्या उन्हामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामात बदल केला आहे.
सोलापूर :
शहरातील वाढत्या उन्हामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामात बदल केला आहे. नव्या आदेशानुसार पहाटे ५.३० ते १२.३० या वेळेत आता साफसफाईचे काम होणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील शहरातील दैनंदिन साफ-सफाईच्या कामकाजाची वेळ ६ ते २ अशी होती.
सध्या शहरामधील वाढते तापमान विचारात घेता वाढती उष्णता व उष्माघातामुळे कर्मचारयांच्या आरोग्यास बाधा पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याच्या दैनंदिन साफ-सफाईचे कामकाजाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आता सकाळी ५.३० ते १२.३० या वेळेत साफसफाईचे काम करण्यात येणार आहे. तरी सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षकांनी स्वच्छता कर्र्मचारयांकडून दैनंदिन साफ-सफाईचे कामकाज करून घ्यावे असेही उपायुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.