संचारबंदीतील प्रभावी नाकाबंदी; अगोदर क्रॉस चेकिंग मगच सोलापूर शहरात एंट्री...
By Appasaheb.patil | Published: July 23, 2020 01:11 PM2020-07-23T13:11:42+5:302020-07-23T13:14:47+5:30
कडक संचारबंदी; इथून म्हणे ग्रामीण पोलीसही शहरात येऊ शकत नाही..
सोलापूर : संचारबंदी कडक म्हणजे कडकच... शहरात येण्यासाठी असलेले प्रवेशद्वार अर्थातच नाके... हे नाके सील केले असून, तेथे आपली चोख ड्यूटी बजावणारे पोलीस शहानिशा करूनच गरजू लोकांनाच प्रवेश देत आहेत. कैक कारणं सांगून घुसण्याचा प्रयत्न करणाºयांना हुसकावूनही लावले जाते. ‘इथून ग्रामीण पोलिसांना शहरात जाता येत नाही, तुमचाच तर विषयच नाही’ असे शहरात घुसणाºयांना पोलीस तंबी देत असताना विशेष नाकाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसते.
सध्या शहरात येणाºया मुख्य रस्त्यांवरील बॉर्डर सील केल्या आहेत. तेथे विशेष नाकाबंदी करण्यात आली असून, शहरात येणाºया प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. शहरात सध्या संचारबंदी असल्याने कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जात नाही. जे प्रवासी सोलापूर बायपासमार्गे पुणे, हैदराबाद, विजयपूर आदी ठिकाणी जाणारे आहेत, त्यांनाच सोडले जात आहे. शेतकरी असतील तर त्यांना सकाळी नऊच्या आत शहराबाहेर जाण्याची परवानगी आहे तर सायंकाळी पाचनंतर त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. शहरात येण्याचा प्रयत्न करणारे बहुतांश दुचाकी व चारचाकी वाहनचालक दवाखान्याचे कारण सांगताना दिसून येत होते. दवाखाना म्हटल्यानंतर संबंधितास दवाखान्याची कागदपत्रे विचारली जात होती. शहानिशा करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता. प्रत्येकाची व्यक्तिगत माहिती नोंद करून घेतली जात होती.
आठ ठिकाणी विशेष नाकाबंदी
- - फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शहरात येणाºया प्रमुख रस्त्यांवर आठ ठिकाणी विशेष नाकाबंदी लावण्यात आली आहे.
- - हैदराबाद रोड, विजापूर रोड, अक्कलकोट रोड, मंगळवेढा रोड, पूणे रोड, तुळजापूर रोड, होटगी रोड व अन्य एक अशा आठ ठिकाणी विशेष नाकाबंदी करण्यात आली आहे.
कामगाराला साप चावलाय, जाऊ द्या
तुळजापूर रोडवरून सोलापुरात प्रवेश करणाºया शेतकºयाला नाकाबंदीमध्ये अडवण्यात आले. विचारणा केली असता शेतकºयाने माझ्या कामगाराला साप चावला आहे. त्याला शासकीय रुग्णालयात अॅडमिट केले आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत, कृपया मला जाऊ द्या, अशी विनंती पोलिसांना करीत होता. पोलिसांनी शेतकºयाला प्रवेश दिला, मात्र जाताना पुन्हा इथे कल्पना देऊन जाण्यास सांगितले.