सहकार मंत्र्याचा पुतळा जाळला; ‘रयत’ संघटनेच्या 9 जणांवर गुन्हा
By दिपक दुपारगुडे | Published: September 19, 2023 07:13 PM2023-09-19T19:13:30+5:302023-09-19T19:38:01+5:30
सरकारने उसाचा प्रतिटन पाच हजार भाव जाहीर करावा, नाहीतर झोनबंदी उठवावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले होते
दीपक दुपारगुडे
सोलापूर : सरकोली (ता. पंढरपूर) येथे रयतक्रांती संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला होता. यामुळे सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करून जमावबंदीच्या आदेशाचा भंग करून तसेच सहकारमंत्री असे लिहिलेला कागद चिटकवून घोषणाबाजी करून कापडी पुतळ्याचे दहन केले म्हणून रयतक्रांती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारने उसाचा प्रतिटन पाच हजार भाव जाहीर करावा, नाहीतर झोनबंदी उठवावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले होते. यामुळे हे आंदोलन करण्याऱ्या रयतक्रांतीचे राज्य कार्याध्यक्ष दीपक जालिंदर भोसले, नितीन धोंडिराम भोसले, अनिल सुभाष भालेराव, पांडुरंग ज्ञानेश्वर भोसले, अमरसिंह बाळासाहेब भोसले, दत्तात्रय एकनाथ भोसले, प्रदीप प्रकाश गायकवाड, सागर शरद भोसले, नेताजी रामचंद्र नागणे (सर्व रा. सरकोली, ता. पंढरपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय भोसले, नेताजी नागणे, पांडुरंग भोसले, कल्याण भोसले, प्रमोद भोसले, समाधान भोसले, सागर भोसले यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.