माेदींना अहंकार, राहुल गांधींची खासदारकी रद्द करुन चुकीचा संदेश दिला; आमदार प्रणिती शिंदे यांची टीका
By राकेश कदम | Published: March 29, 2023 06:45 PM2023-03-29T18:45:56+5:302023-03-29T18:46:17+5:30
भारताबद्दल जगात चुकीचा संदेश गेला, अशी टीका काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केली.
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकार आहे. त्यांना वाटते की आमचं कुणी काही बिघडू शकत नाही. विरोधी पक्षातील मोठ्या नेत्याची खासदारकी रद्द करणे गंभीर आहे. यातून भारताबद्दल जगात चुकीचा संदेश गेला, अशी टीका काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केली.
काॅंग्रेसचे नेतेे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी बुधवारी महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळा परिसरात सत्याग्रह केला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज देशात अराजकता आहे. विरोधकांना बाेलू दिले जात नाही. भारतात लाेकशाहीची हत्या हाेत आहे हे राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात बोलले होते हे आज खरे ठरत आहे. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली. याचीच पंतप्रधान मोदींना भीती वाटली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाल्या.