सोलापुरात बकरी ईद साजरी; सुखः शांती, पाऊस अन् समृद्धीसाठी मुस्लिम बांधवांची अल्लाहकडे प्रार्थना
By Appasaheb.patil | Published: June 29, 2023 09:50 AM2023-06-29T09:50:40+5:302023-06-29T09:51:51+5:30
ईदच्या नमाजनंतर उपस्थित समाजबांधवांनी एकमेंकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सोलापूर : जुनी मिल स्टेशन रोड, शाही आलमगीर ईदगाह पानगल हायस्कूल, आलमगीर ईदगाह होटगी रोड व आदिलशाही ईदगाह, जुनी मिल कंपाउंड येथील ईदगाह मैदान येथे बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी सामूदायिक नमाज पठण केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी सुख शांती, पाऊस, समृद्धीसाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.
दरम्यान, शहरात सकाळी ईदगाह मैदान येथे ९ वाजता सामूदायिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाज बांधव जमले होते. सामूदायिक नमाज पठण करून देशाच्या सुख-शांती, भरपूर पाऊस, रोजगार व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या नमाजनंतर उपस्थित समाजबांधवांनी एकमेंकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ईद-उल अजह म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कॅलेंडरमध्ये जिल हिज्ज शेवटचा महिना आहे. महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी साजरी केली जाते. रमजानचा महिना संपल्यानंतर ७० दिवसांनी हा सण येतो. या महिन्यात हज यात्रेचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बकरीत सोलापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.