बनावट चावीनं दुकानाचे शटर उघडून साडे आठ लाख रूपये पळविले
By दिपक दुपारगुडे | Published: June 2, 2023 03:48 PM2023-06-02T15:48:17+5:302023-06-02T15:48:26+5:30
बुधवारी सकाळी दुकानातील कामगार दुकानात आल्यानंतर त्यांना आपल्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले पैसे आढळले नाही.
सोलापूर : बाळे परीसरातील टायर शोरूमचे शटर बनावट चावीने उघडून ड्रॉव्हर मधील ८ लाख ३५ हजार रोख रक्कम व डीव्हीआर असे एकूण ८ लाख ६५ हजारांची चोरी केल्याची घटना दि. ३० ते ३१ मे रोजी बाळे येथे घडली. याप्रकरणी संतोष मदनलाल भंडारी (वय ५०, रा. सनसिटी, जाम मिल कंपाऊंड, लक्ष्मी पेठ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी सकाळी दुकानातील कामगार दुकानात आल्यानंतर त्यांना आपल्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले पैसे आढळले नाही. ही माहिती त्यांनी फिर्यादींना सांगितली. यामुळे फिर्यादींनी आपल्या गल्ल्यातील पैसे पाहिले असता त्यांना गल्ल्यातील पैसे आढळले नाही. सीसीटीव्ही तपासण्यासाठी पाहिल्यानंतर तेथील डीव्हीआरची वायर कट करून डीव्हीआर अज्ञाताने पळविले होते.
याप्रकरणी त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.