चपळगावात आठ घरफोड्या; मुलीच्या लग्नासाठी आणलेल्या सोन्यावर चोरांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:53 PM2021-05-12T17:53:19+5:302021-05-12T17:53:26+5:30
गावच्या पोलीस पाटलाचेही घर फोडले
चपळगाव - आधीच लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. यामूळे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. ही वस्तुस्थिती सुरू असताना लाॅकडाऊनच्या पूर्वीच चपळगाव ता.अक्कलकोट येथील मनोज उपासे यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आवश्यक बाबींची खरेदी केली व घरात आणून ठेवल्या. जेणेकरून लाॅकडाऊनमध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत. मात्र लग्नापूर्वी ऐनवेळी चोरट्यांनी सोन्यावर डल्ला मारल्याने लग्नासाठी तयार असलेल्या उपासे कुटूंबावर संक्रात्र ओढवले आहे. विशेष म्हणजे उपासे यांच्यासह चपळगावातील आठ घरांमध्ये चोरट्यांनी सोने, रोकड व इतर साहित्यांवर डल्ला मारला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी वादळ व पावसाने चपळगाव परिसरात रात्री वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर उकाडा व खंडित वीजपुरवठा यामुळे चपळगावातील जनतेने सोमवारची रात्र जागून काढली. यानंतर मंगळवारी वातावरण सुरळित झाल्याने रात्री ग्रामस्थ लवकर झोपी गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश लोक गच्चीवर झोपी गेले. याचा फायदा चोरट्यांनी घेतला व डाव साधला. यामध्ये विशेषतः मनोज बसवराज उपासे व रेवणसिध्द बुगडे यांच्या घरात जबरी चोरी झाली आहे.
त्याच बरोबर त्याच गावातील रेवणसिद्ध पंडित बुगडे यांच्या घराचे कडी कोयांडा तोडून ९० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे सोने त्यात एक बोरमाळ, कानातील सोन्याचे टॉप्स व ७० हजार रोख रक्कम असे एकूण १ लाख ६० हजाराचे ऐवज लंपास केले आहे. दीपक चन्नप्पा पाटील, यल्लव्वा मल्लप्पा साखरे,राचप्पा भिमाशंकर हन्नुरे,दीपक बसवण्णा पाटील, पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ, शरणप्पा ख्याडे असे एक नाही आठ घरांची चोरी झाली आहे. एकाच रात्री आठ घरांची चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची खबर मनोज उपासे यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यास दिली आहे. घटनास्थळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, पो हे कॉ अजिंक्य बिराजदार, पो हे कॉ फिरोज मियावाले, पो हे कॉ आकाश कलशेट्टी, याच बरोबर सोलापूर ग्रामीणचे श्वान पथक व ठसे तपासणी पथक सोलापूर यांचे कर्मचारी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.