माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निंबाळकरांसह आठ उमेदवारांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:48 AM2019-04-02T10:48:12+5:302019-04-02T10:51:00+5:30
आतापर्यंत या मतदारसंघात एकूण १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह आठ उमेदवारांनी एकूण अकरा अर्ज दाखल केले. निंबाळकर यांनी यावेळी तीन अर्ज दाखल केले तर हिंदुस्थान प्रजा पक्ष व बहुजन महापार्टीच्या उमेदवारांनीही निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंद यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवसेनेचे आ. नारायण पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, प्रा. शिवाजी सावंत आदींच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथील नवनाथ पाटील यांनी यावेळी हिंदुस्थान प्रजा पक्षाकडून तर कुर्डूवाडीचे शहाजहान शेख यांनी बहुजन महापार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माळशिरस तालुक्यातील फडतरी येथील बाबुराव रुपनवर, पुण्यातील चिंचवड येथील रामदास माने, मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील सिद्धेश्वर आवारे, माण तालुक्यातील अजिनाथ केवटे,संदीप खरात या उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
४ एप्रिल माढा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. बुधवार ३ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासह अन्य उर्वरित पक्षातील उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या मतदारसंघात एकूण १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सुभाष देशमुखांसह १२ जणांनी घेतला अर्ज
- भाजपचे उमेदवार म्हणून रणजितसिंह निंबाळकर यांचा अर्ज दाखल केल्यानंतरही पूरक अर्ज भरणार आहे असे सांगून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज घेतला आहे. यावेळी अन्य ११ जणांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. यात सोलापूरचे हिंदुस्थान जनता पार्टीचे इरफान पटेल, करमाळ्याचे उमेदवार अशोक वाघमोडे, फलटणचे राजेंद्र भोसले, सोलापूरचे संदीप बेंद्रे, पंढरपूरचे हनुमंत देव, सांगोल्याचे दत्तात्रय खटके, सोलापूरचे रोहन मोरे, फलटणचे शिवाजी अभंग, अक्कलकोटचे मंजूनाथ सुतार व पंढरपूरचे अब्दुल मुलाणी यांचा समावेश आहे.