सोलापूर महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडीला आठ दिवसांची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:12 PM2021-03-05T12:12:39+5:302021-03-05T12:12:43+5:30
महाआघाडीच्या धक्कादायक खेळीने भाजप अवाक्
सोलापूर : महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीला नगर विकास खात्याने आठ दिवसाची स्थगिती दिली आहे. सत्ताधारी भाजपने गुलालाची तयारी केली होती. परंतु महाआघाडीच्या खेळीने भाजप नगरसेवक अवाक् झाले.
स्थायी समितीच्या सदस्याची निवड २० फेब्रुवारी रोजी करण्यात आली. सदस्य निवडीवरून एमआयएम मध्ये वाद झाला होता. यात एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी स्वत:च्या नावाची शिफारस महापौर श्रीकांचना यन्नम यांंच्याकडे केली होती. परंतु, एमआयएमचे गटनेतेपद नूतन गायकवाड यांच्याकडे असल्याचा दावा नगरसेवक तौफिक शेख यांनी केला होता. विभागीय आयुक्तांंकडे नूतन गायकवाड यांची गटनेते म्हणून नोंद आहे. गायकवाड यांनी स्थायी समितीच्या सदस्या म्हणून पूनम बनसोडे यांची शिफारस केली आहे. हीच शिफारस ग्राह्य धरण्यात यावी अशी मागणी तौफिक शेख आणि पूनम बनसोडे यांनी केली होती.
महापौर यन्नम यांनी खरादी यांची शिफारस ग्राह्य धरली. याविरुध्द पूनम बनसोडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन स्थायी समिती सदस्य निवड आणि सभापती निवडीला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. पूनम बनसोडे यांनी या निवडीबद्दल नगरविकास खात्याकडे तक्रार केली होती. यावरून नगर विकास खात्याने शुक्रवारी सुरू असलेल्या स्थायी समिती सभापती च्या निवडीला आठ दिवसांची स्थगिती दिली. सदस्य निवडीचा अहवाल सादर करण्यात यावा. त्यानंतरच निवड प्रक्रिया व्हावी असेही नगरविकास खात्याने कळविले आहे