बार्शीत जुगार अड्ड्यावरील धाडीत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:46+5:302021-02-05T06:50:46+5:30
बार्शी : तालुक्यात बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी येताच सोलापूर ग्रामीणच्या विशेष पोलीस पथकाने बार्शीत येऊन मन्ना नावाचा ...
बार्शी : तालुक्यात बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी येताच सोलापूर ग्रामीणच्या विशेष पोलीस पथकाने बार्शीत येऊन मन्ना नावाचा जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांना ताब्यात घेतले.
शहरात बोंबल्या मारुती मंदिरासमोर एका कारखान्यातील खोलीत शनिवारी सायंकाळी हा जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. कारवाईत पोलिसांनी रोख १ लाख ४१ हजार रुपये जप्त केले, तसेच चार चाकी, तीन दुचाकी व नऊ मोबाइल अशा प्रकारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या अवैध व्यवसायाबद्दल विविध सामाजिक संघटनांनी पोलीस अधीक्षक तक्रारी दिल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारवाईचा बडगा उगारला. पथकप्रमुख पोलीस निरीक्षक विनय बहीर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. आरोपी हे गोल रिंगण करून पत्ते टाकून मन्ना जुगार खेळताना दिसले.
याप्रकरणी पोलिसांनी महेश स्वामी (६०, रा. कासारवाडी रोड), मुद्दसर बागवान (३३, रा. सोमवर पेठ), अब्दुल पठाण (५८, रा. नागणे प्लॉट), सुधीर नाकाडे (६३, सोलापूर रोड), नागेश सुरवसे (३५, सुभाष नगर), सचिन बावकर (३३, सुभाषनगर), गणेश नान्नजकर (४०, आगळगाव रोड, बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पथकातील पोलीस कर्मचारी सतीश एनगुले यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे करत आहेत.