मतमोजणीवेळी आठ मतदानयंत्र पडले बंद
By appasaheb.patil | Published: May 23, 2019 07:09 PM2019-05-23T19:09:25+5:302019-05-23T19:10:59+5:30
सोलापूर लोकसभा मतदारसंघ; एक तास १० मिनिटे मतमोजणी प्रक्रिया थांबली
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीवेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आठ ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली़ या घटनेमुळे १ तास १० मिनिटे मतमोजणीची प्रक्रिया बंद होती अशी माहिती भाजपचे कार्यकर्ते श्रीशैल बनशेट्टी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सोलापुरातील रामवाडी गोदामात सकाळी आठ वाजता सुरूवात झाली़ दुपारपर्यंत सुरळीत मतमोजणी सुरू होती़ विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीवेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी करीत असताना आठ ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला़ यामुळे काही काळ प्रशासनाची धांदल उडाली़ शेवटी प्रशासनाने मशीन दुरूस्त करणाºया तांत्रिक अधिकाºयांना बोलावून घेऊन दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आठ ईव्हीएम मशीन्स बंद पडल्या होत्या़ याबाबत माहिती मिळताच मी स्वत:हुन त्या मशीन्सची तपासणी केली़ लॉक बटन सुरू न केल्याने मशीन सुरू होत नव्हत्या, मात्र काही कालावधीनंतर मशीन्स दुरूस्त केल्यानंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली़ आता सुरळीत मतमोजणी प्रक्रिया सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले़ यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ उपस्थित होते़ सध्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया संपली असून व्हीव्हीपॅट ची मोजणी सुरू असल्याचेही नगरसेवक नागेश वल्याळ यांनी सांगितले.