वयस्कर भाविकांना, लहान मुलांना दर्शन पास मिळत असल्याने होतोय नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:36+5:302020-12-29T04:21:36+5:30
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी रोज मोजक्याच लोकांना अटी व शर्तीसह विठ्ठलाचे मुखदर्शन घडविण्याचे चांगले काम ...
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी रोज मोजक्याच लोकांना अटी व शर्तीसह विठ्ठलाचे मुखदर्शन घडविण्याचे चांगले काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. मात्र वयस्कर, गर्भवती महिला व लहान मुलांना विठ्ठलाचे मुखदर्शनदेखील घेण्यास बंदी करण्यात आली आहे. असे असले तरी ऑनलाइन पद्धतीने दर्शन पास बुकिंग करण्याच्या प्रणालीत मंदिर समितीने सुधारणा न केल्यामुळे अनेक भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोना संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून गर्दी टाळण्यात येत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी मंदिर समितीने १८ मार्चपासून विठ्ठलाचे दर्शन भाविकासाठी बंद केले होते.
त्यानंतर राज्य शासनाने १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना १६ नोव्हेंबरपासून दर्शनासाठी खुले करून देण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकांना ऑनलाइन दर्शनप्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून दर्शन पास घेणे अनिवार्य केले आहे. डिसेंबरमध्ये ३००० हजार भाविकांना दिवस भरात दर्शन घेता येईल, असे नियोजन केले. परंतु भाविकांच्या दिवसातील सर्व ऑनलाइन पद्धतीने दर्शन पास बुकिंग केले जातात. प्रत्यक्षात तेवढे भाविक दर्शनासाठी येत नाहीत, तर दर्शनपास बुकिंग केलेल्या पैकी ६० टक्के भाविक दर्शनाला येतात. त्यासाठी दहा तासांचे स्लॉट (भाग) निश्तिच करण्यात आलेले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वयस्कर, गर्भवती महिला व लहान मुलांना होण्याचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. यामुळे या गटातील भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शनदेखील घेण्यास बंदी केली आहे. मात्र ऑनलाइन पद्धतीने दर्शन पास बुकिंग करण्याच्या प्रणालीत आजही वरील लोकांचे पास मिळत आहेत. यामुळे हे लोक ऑनलाइन पास घेऊन दर्शनासाठी येत आहेत. मात्र ते पंढपुरात आल्यानंतर दर्शन रांगेत थांबण्यासाठी गेल्यानंतर त्यांना माघारी हाकलण्यात येते. यामुळे भाविकांना पंढरपुरात येण्याचा प्रवास, शहरात राहण्याचा खर्च करावा लागत आहे. यासर्व गोष्टींचा अनेक भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मंदिर समितीने ऑनलाइन दर्शन पास बुकिंगप्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे भाविकांनी सांगितले.
वय झाल्यावर देवाला यायचे नाही तर कधी यायचे
आम्ही पाच महिला बार्शी येथून गाडी घेऊन श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलो आहे. पंढरपुरात येण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंग करून दर्शन पास घेतला. दर्शन रांगेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर्शन घेता येणार नाही, असे सांगून माघारी हाकलेले जात आहे. वय झाल्यावर देव-देव, यात्रा, एकादशी करायची? नाही तर कधी करायची? असा सवाल प्रशासनाला लीलावती जाधव (रा. बार्शी) यांनी केला.
दर्शन पास मिळाल्याने आलो, मुलांना ठेवायचे कोठे?
मुलगी, जावाई, त्यांचा लहान मुलगा व मी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुंबईवरून आलो आहे. आम्हा सर्वांना मुखदर्शन पास मिळाला. यामुळे आलो आहे. परंतु याठिकाणी लहान मुलांना दर्शन घेता येणार नाही, असे सांगितले आहे. मंदिर समितीकडून असे पास दिले जाऊ नयेत. यामुळे भाविकांना मानसिक त्रास सहन करावा लगत आहे. दर्शनाला जाताना मुलांना कोठे ठेवून जावे. तो आई व वडिलांना सोडून राहत नाही. असे नारायण थोबडे (रा. पुणे) यांनी सांगितले.
कोट :::::::::::
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना, गर्भवती महिला व लहान मुलांना दर्शन घेता येणार नाही. याबाबत मंदिर समितीने अनेक वेळा आवाहन केले आहे. त्याचबरोबर दर्शन पासच्या माघील बाजूलादेखील सूचना लिहिल्या आहेत. त्यामध्येही ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे.
- विठ्ठल जोशी,
कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
फोटो लाईन : २७पंड०१
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लहान मुलांचा दर्शन पास घेऊन आले. मात्र मंदिरात प्रवेश मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करताना थोबडे कुटुंब. (छाया : सचिन कांबळे)
२७पंड०२
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वेबसाइडवरून लहान मुलाचा पास मिळाला आहे. (छाया : सचिन कांबळे)