नग्नावस्थेतील वृद्धाने तहसील कार्यालयात घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:38 IST2019-06-20T18:29:48+5:302019-06-20T18:38:03+5:30
उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयातील प्रकार; निराधारांचे पैसे मिळत नसल्याचा केला आरोप

नग्नावस्थेतील वृद्धाने तहसील कार्यालयात घातला गोंधळ
सोलापूर : सगळे बाहेर चला.. अजिबात कोणी बोलायचे नाही.. पोलीस लोकांना बोलवा.. आमच्यावर अन्याय करता.. असा आवाज केला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याने. अगदी नग्नावस्थेतील वृद्धाच्या गोंधळाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात एकच गडबड झाली.
दुपारच्या सुमारास कुमार शिवाजी मोरे हे वृद्ध तहसील कार्यालयात अगदी नग्नावस्थेत दाखल झाले. त्यांनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या केबिनजवळ येऊन सगळे बाहेर चला, अजिबात कोणी बोलायचे नाही, पोलिसांना बोलवा, आमच्यावर अन्याय करता, अजिबात आवाज करायचा नाही, मला हाकलतो का बाहेर, येणाºयांना दम देता का?, काम करत नाही, नरडं दाबून टाकीन, माझे निराधाराचे प्रकरण केले नाही असा एकच आवाज केला.
त्यानंतर त्यांचे कुमार मोरे असे नाव असून त्यांचा पत्ता रेल्वे लाईन असल्याचे समोर आले. मोरे हे मतिमंद असल्याने अपंगातून त्यांना दरमहा निराधारचे वेतन दिले जात असल्याचे सांगण्यात आले. बँकेचे पासबुक व तहसील कार्यालयाच्या रजिस्टरची पाहणी केली असता मे महिन्यापर्यंतचे वेतन दिले असल्याचे अव्वल कारकून महिबूबपाशा सरकाझी यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वीही अशाच पद्धतीने मोरे यांनी तहसील कार्यालयात कपडे काढून गोंधळ केला होता असे सांगण्यात आले; मात्र तहसील कार्यालयात आलेल्यांना नग्नावस्थेतील चित्र व गोंधळ ऐकायला मिळाला.