निवडणूक ग्रामपंचायतीची; समिकरणे झेडपी-पंचायत समितीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:54 AM2021-01-13T04:54:56+5:302021-01-13T04:54:56+5:30

तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. बिनविरोध एका ग्रामपंचायतीसह ७१ ग्रामपंचायतींतील काही प्रभाग वगळता अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी, ...

Election of Gram Panchayat; Equations of ZP-Panchayat Samiti | निवडणूक ग्रामपंचायतीची; समिकरणे झेडपी-पंचायत समितीची

निवडणूक ग्रामपंचायतीची; समिकरणे झेडपी-पंचायत समितीची

Next

तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. बिनविरोध एका ग्रामपंचायतीसह ७१ ग्रामपंचायतींतील काही प्रभाग वगळता अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. प्रत्येक गावात तालुकास्तरावरील स्व. आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, आ. बबनराव शिंदे, समाधान आवताडे यांना मानणारा वर्ग आहे. याशिवाय शेतकरी चळवळीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे.

तालुकास्तरावरील नेतृत्वाला गावलेव्हलचा प्रत्येक गट मानत असला तरी गावात मात्र मीच नेता या आविर्भावात असतो. त्यामुळे प्रत्येक निवडणुका माझ्या नेतृत्वातच लढल्या पाहिजेत, असा आग्रह अनेक गाव लेव्हलच्या कार्यकर्त्यांचा आहे. मात्र, त्यांना गावातील दुसरा गट मानायला तयार नसल्याने नेतृत्वाला आपले स्वतंत्र नेतृत्व दाखविण्यासाठी मिळेल त्या गटाला, संघटनांना हाताशी धरून ग्रामपंचायतींत आपलेच सदस्य सर्वाधिक कसे निवडून येतील, आपली सत्ता कशी येईल, यासाठी प्रत्येक गट प्रयत्नशील असल्याने गावागावांत स्थानिक आघाड्यांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

झेडपी-पंचायत समितीची समीकरणे

पंढरपूर तालुक्यात ग्रामपंचायतीनंतर पुढील काळात पंचायत समिती, झेडपी, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक आदी महत्त्वाच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे तालुका नेतृत्वालाही कोणत्या एका गटाला हाताशी धरून निवडणुका लढविणे धोक्याचे असल्याने भविष्यात आपल्याला सर्वजण मदत करतील, हा उद्देश समोर ठेवून स्थानिक आघाड्या करण्यासाठी मूकसंमती दिल्याचे चित्र आहे. प्रत्येक गटाच्या तालुका नेतृत्वाने प्रथम गावागावांतील आपल्या गटांना एकत्र येऊन निवडणुका लढवा, बिनविरोधसाठी प्रयत्न करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, ही समीकरणे जुळत नसतील तर प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे आघाड्या करा. मात्र, तालुकास्तरावरील निवडणुकांमध्ये गावातून आपल्याला सर्वाधिक लीड कसे मिळेल, याची समीकरणे जुळवा, याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे गावागावांतील गट स्वत:च्या वर्चस्वासाठी जीवाचे रान करत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवित आहेत.

Web Title: Election of Gram Panchayat; Equations of ZP-Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.