निवडणूक निरीक्षकांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:14+5:302021-04-12T04:20:14+5:30
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांत केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी निरीक्षक ...
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांत केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी निरीक्षक गिरी यांनी केली. यामध्ये पंढरपूर, खर्डी, कासेगाव, एकलासपूर, सिद्धेवाडी, मंगळवेढा येथील ६४ मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था व मतदान रांगांमधील अंतरासाठी केलेली व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठीची सुविधा, आदींची पाहणी करून आवश्यक त्या सूचना गिरी यांनी केल्या.
मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागांतील सर्वच मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. मतदान केंद्रावर हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क, आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण व मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी पवार, मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे उपस्थित होते.