ऐन उन्हात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धगाटा; १,५४६ सहकारी संस्थांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:33 PM2022-04-03T17:33:54+5:302022-04-03T17:34:00+5:30
बँका, शिक्षक पतसंस्था, साखर कारखान्यांचा समावेश
सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, बँका, दूध संस्था व हाॅस्पिटल अशा १,५४६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बार मे महिन्यात उडणार आहे. एका वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्यांदाच होत आहेत. अगोदरच कडक उन्हाळा असताना, निवडणुकामुळे जिल्ह्यातील वातावरण आणखी गरम होणार आहे.
अगोदर कर्जमुक्ती योजनेसाठी कर्मचारी गुंतल्याने, तर नंतर कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, या निवडणुका मागील तीन महिन्यांपासून सुरू आहेत. २०१९, २०२०मध्ये मुदत संपलेल्या काही संस्थांच्या निवडणुका पार पडल्या असून, काही संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. काही संस्थांची मुदत संपली असली, तरी संस्थांकडून मतदार याद्या आल्या नसल्याने प्रशासक व अवसायक नेमले आहेत.
चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यांतील निवडणुका आता एकाच टप्प्यात घेण्याच्या सूचना निवडणूक प्राधिकरणाने दिल्या आहेत. तीन टप्प्यांतील १,५४६ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदार याद्या मागविण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रथमच होत आहेत.
- भीमा सहकारी टाकळी सिकंदर, संत दामाजी मंगळवेढा, संत कुर्मदास, विठ्ठल गुरसाळे, स्वामी समर्थ साखर कारखाना अक्कलकोट
- * स्वामी समर्थ सूत गिरणी वळसंग, वसंतराव नाईक सूत गिरणी, शेतकरी सहकारी सूत गिरणी सांगोला, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सूत गिरणी सावळेश्वर, शिवामृत सहकारी दूध संघ अकलूज.
- * जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था, माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्था, शिवशंकर ग्राहक भांडार, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय.
- * रुक्मिणी बँक, पंढरपूर मर्चंट बँक, सांगोला अर्बन बँक, कृषिसेवा अर्बन बँक, सिद्धेश्वर बँक, जनता बँक कुर्डूवाडी, पंढरपूर अर्बन बँक, राजमाता बँक, लोकमंगल बँक, महेश बँक, लक्ष्मी बँक, शरद बँक , निधीगंधा बँक आदी १,५४६ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
२०१९ व २०२० मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. काही संस्थांवर अवसायक नेमले आहेत. २०२१ व मार्च २२ पर्यंत मुदत संपणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करायची आहे.
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक सोलापूर.