सोलापूर बाजार समितीची निवडणुक दिलेल्या मुदतीत होणार नाही , जिल्हा उपनिबंधकांनी प्राधिकरणाला कळविले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:10 PM2018-02-16T16:10:37+5:302018-02-16T16:11:37+5:30
सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
सोलापूर बाजार समितीची १६ एप्रिल व बार्शी बाजार समितीची निवडणूक ११ मार्चपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका होणार नाहीत, हे आता स्पष्ट दिसत असल्याने निवडणुका कधी होणार?, हे उच्च न्यायालयाला सांगावे लागणार आहे. मतदार यादीबाबत नियमावली नुकतीच आल्याने अद्याप प्रारुप मतदार यादीही तयार नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी अंदाजे किती कालावधी लागणार, हे कळविण्याच्या सूचना निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी साधारण मतदार यादीवर हरकतीपासून निवडणूक निकाल लागेपर्यंत ७० दिवस लागतील, असे कळविले आहे. निवडणूक प्राधिकरण यानुसार उच्च न्यायालयासमोर ही बाजू मांडणार आहे.
----------------------
असा असेल कालावधी
- प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवस हरकतीसाठी, आलेल्या हरकतींवर सुनावणी घेणे व निर्णय देण्यासाठी १० दिवस, पाच दिवस अंतिम मतदार याद्या तयार करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. निवडणूक प्राधिकरणाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी ठेवला असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच दिवस, सहाव्या दिवशी छाननी, ७ व्या दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवस, एक दिवस निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ७ ते १५ दिवसांनंतर मतदान व तीन दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे, असा अंदाजे निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाला पाठविला आहे.
-------------------
ई.व्ही.एम. मशीनचा होणार वापर?
- लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ई.व्ही.एम. मशीनचा वापर करण्यात आला होता. आजपर्यंतच्या मतपत्रिकेद्वारे होणाºया या निवडणुका मशीनद्वारे होत असल्याने आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका की ई.व्ही.एम. मशीनद्वारे मतदान होणार?, याचा निर्णय झालेला नाही. निवडणूक प्राधिकरणाकडे याबाबत चौकशी केली असता मतदारांच्या संख्येवर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.