दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे निवडणूक रंगतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:27+5:302021-01-13T04:55:27+5:30
भाजपचे तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे उपसभापती आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी पदे भूषविणाऱ्या रामप्पा चिवडशेट्टी यांना विरोधकांनी ...
भाजपचे तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे उपसभापती आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी पदे भूषविणाऱ्या रामप्पा चिवडशेट्टी यांना विरोधकांनी एकत्रितपणे घेरले आहे. होटगीच्या राजकारणावर परिसरातील यत्नाळ, होटगी स्टेशन, हिपळे, फताटेवाडी, औज, तिल्लेहाळ या गावांचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे माजी आमदार दिलीप माने, झेडपी सदस्य अमर पाटील, हरीश पाटील, दत्ता घोडके या सर्वपक्षीय नेत्यांनी चिवडशेट्टी यांना लक्ष बनविले आहे. त्यांची वीस वर्षे गावच्या राजकारणावर पकड आहे ती ढिली करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
होटगी तलावाच्या शेजारची १३० एकर जमीन जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे. ती ग्रामपंचायतीचा बोगस ठराव करून म्हैस संशोधन केंद्राला हस्तांतरित करण्याचा मुद्दा होटगी-सावतखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चांगलाच गाजत आहे. जमीन लोकमंगलला देण्याचा घाट होता असा आरोप सताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. मात्र, हा आरोप ग्रामस्थांची दिशाभूल करणारा असून, वस्तुस्थिती लपविली जात आहे. जलसंपदा विभागाची शासकीय जमीन केंद्र शासनाच्या म्हैस संशोधन केंद्राला देण्याचा ठराव केला. यात लोकमंगलला संबंध नाही असा खुलासा सत्ताधारी गटाचे रामप्पा चिवडशेट्टी यांनी केला आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील समर्थ विकास पॅनेलची थेट लढत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्या ग्रामविकास पॅनेलशी होत आहे. दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी १५ उमेदवार असून, अपक्षांमुळे ही संख्या ४४ झाली आहे. कल्याणी कोकरे, चंद्रकांत कोटाणे, शिवानंद हुडे, अतुल गायकवाड, इमाम शेख, रेवनसिद्ध पटणे, विजयकुमार फताटे यांची त्यांना साथ आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-भाजप-शिवसेनेचे दिलीप माने, अमर पाटील, दत्ता घोडके, राजेंद्र गंगदे, श्रीकांत मेलगे-पाटील यांच्या पॅनेलशी त्यांचा सामना आहे. पाटील-चिवडशेट्टी यांच्यातील राजकीय चुरस यानिमित्ताने समोर आली आहे. यापूर्वी पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकदा उभयतांत थेट लढत झाली होती.
चौकट
होटगी : सावतखेड ग्रामपंचायत
एकूण जागा : १५
उमेदवार रिंगणात : ४४
मतदार संख्या : ६५००
लढत - भाजपचे रामप्पा चिवडशेट्टी विरोधात काँग्रेसचे हरीश पाटील, सेनेचे माजी आमदार दिलीप माने, झेडपी सदस्य अमर पाटील, राजेंद्र गंगदे आणि भाजपचे दत्ता घोडके.