निवडणूक आली अन्‌ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमला कोट्यावधींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:18 AM2021-01-02T04:18:54+5:302021-01-02T04:18:54+5:30

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला ...

Elections came and crores of revenue were collected in the accounts of Andhra Gram Panchayats | निवडणूक आली अन्‌ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमला कोट्यावधींचा महसूल

निवडणूक आली अन्‌ ग्रामपंचायतींच्या खात्यात जमला कोट्यावधींचा महसूल

Next

वर्षानुवर्षे थकलेली ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी वसूल होत आहे. या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

गावातील अंतर्गत राजकारण व कर भरण्याबाबत नागरिकांची उदासीनता यामुळे वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे कर वसूल होत नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे विविध नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा कर इच्छुक उमेदवारांकडून भरण्यात येत असल्याने तालुक्यात तब्बल साडेतीन कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला आहे. सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. ३० डिसेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. अर्ज भरताना ग्रामपंचायतीचे कर थकीत नसल्याचा दाखला, रहिवासी, शौचालय आदी विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतीची बाकी भरल्याशिवाय आवश्यक दाखले ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दिले जात नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव गावातील इच्छुक उमेदवारांकडून वर्षानुवर्षे थकीत असलेली लाखो रुपयांची विविध प्रकारची बाकी भरण्यात आली आहे.

पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी जवळपास ३,१६६ उमेदवारांनी ३,३३३ अर्ज दाखल केले आहेत. यामधील प्रत्येक उमेदवाराने सरासरी १० हजार रुपये बाकी धरली तरी हा आकडा ३ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वारंवार विनंत्या, नियम, अटी घालूनही ग्रामपंचायतींचा वसूल न होणारा महसूल ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने वसूल झाला आहे.

उमेदवारांची बाकी पॅनलप्रमुखांनी भरली

गावात ग्रामपंचायत निवडणूक आली की प्रत्येक गटाकडून स्वतंत्र पॅनल करण्याची धावपळ सुरू असते. त्यासाठी आरक्षणनिहाय प्रत्येक प्रभागात त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची गरज असते. अशावेळी प्रत्येक गटाला उमेदवार मिळेल याची खात्री नसते. उमेदवार मिळाला तर ग्रामपंचायतीची थकीत बाकी भरण्याची परिस्थिती त्या उमेदवाराची नसते. मात्र पॅनल टाकण्यासाठी उमेदवार आवश्यक असल्याने अशा उमेदवारांची ग्रामपंचायत थकबाकी त्या त्या गटाच्या पॅनलप्रमुखांनाच भरावी लागत असल्याचे चित्र आहे. सध्या प्रत्येक गावात पॅनलप्रमुखांनी लाखो रूपयांची बाकी स्वखर्चातून भरली असल्याने ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ झाली आहे.

----

Web Title: Elections came and crores of revenue were collected in the accounts of Andhra Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.