लवकरच निवडणूका जाहीर होणार, भाजपासोबत काम करा; एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:03 AM2023-04-12T10:03:00+5:302023-04-12T10:03:24+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर शिवसैनिकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
पंधरा दिवसांत पुन्हा मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. तोपर्यंत विविध कामांसंदर्भातील प्रशासकीय मंजुरीच्या मान्यतेसाठीच्या याद्या तयार ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हा, मनपा, जिल्हा परिषद व महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. १० मिनिटांच्या वेळेत त्यांनी संवाद साधून सूचना केल्या. महापालिका निवडणूका लवकरच असून, भाजपसोबत काम करण्याचा त्यांनी शिवसैनिकांना कानमंत्र दिला.
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेत आणि फळपिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर सोलापूर विमानतळावरून त्यांनी खासगी विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. यावेळी सोलापूर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. पुन्हा सोलापूरात परतल्यावर महत्त्वाचे रखडलेली कामे मार्गी लागतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.
पक्षासाठी काम करा-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर शिवसैनिकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. याचवेळी त्यांनी सांगितले की, लवकरच निवडणुका जाहीर होणार आहेत. आपल्याला भाजपासोबत काम करायचं आहे. त्यामुळे एकत्रितपणे बैठका, चर्चा करून पक्षासाठी काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
उजनी - सोलापूर जलवाहिनीचे काम सुरु करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या पाणीप्रश्नाबाबत आयुक्त शितल तेली-उगले यांच्याशी चर्चा केली. मी चेअरमन असिम गुप्ता यांच्याशी बोलतो, लवकरात लवकर उजनी - सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम सुरु करा. येत्या १५ दिवसांत ते काम सुरु करा अशाही सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.