सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २५९ कृषीपंपांच्या वीजजोडणीचे काम पूर्ण
By appasaheb.patil | Published: August 31, 2019 12:46 PM2019-08-31T12:46:55+5:302019-08-31T12:48:08+5:30
महावितरण : ११ हजार ७८७ कृषीपंपांना मिळणार उच्चदाब वितरण प्रणालीव्दारे वीजजोडणी; ‘एचव्हीडीएस’च्या कामांना वेग
सोलापूर : बारामती परिमंडल अंतर्गत पेडपेंडींग असणाºया ११ हजार ८७८ कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १ हजार २५९ कृषीपंपांसाठी वीजजोडणी देण्याच्या वीजयंत्रणेची कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी ६६१ कृषीपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘एचव्हीडीएस’च्या कामांना मोठा वेग देण्यात आला असून येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत या योजनेतील सर्वच कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
बारामती परिमंडल अंतर्गत मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाºया सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, बार्शी, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, माढा, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा आदी तालुक्यातील ११ हजार ८७८ कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येत आहे़ या वीज जोडण्यासाठी बारामती परिमंडलातील १९७ निविदांद्वारे कंत्राटदारांना विविध कामांचे आदेश देण्यात आले आहेत़ या सर्व वीजजोडण्यांच्या कामांसाठी ५२२ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या नव्या वीजजोडण्या उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघाताचा धोका नाही. उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही व वीजहानीमध्ये घट होईल.
रोहित्र बिघडणे होणार बंद...
प्रचलित पद्धतीनुसार कृषीपंपांना ६३ केव्हीए /१०० केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. एका रोहित्रावर जवळपास १५ ते २० कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो. लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर एचव्हीडीएस प्रणालीद्वारे मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषीपंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या एचव्हीडीएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत. उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) द्वारे शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.
एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषीपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल. कृषीपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे. त्यामुळे कृषीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे व रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण सुद्धा अतिशय नगण्य राहणार आहे.
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण