ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:41 PM2018-05-03T18:41:13+5:302018-05-03T18:41:13+5:30
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे.
सोलापूर : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील सुमारे ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिर्द्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचेउद्दिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या २३ जिल्हयांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यायची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे २०१८ रोजीच पूर्ण केले असून या १९२ गावातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वात प्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्यामुळे राज्यातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात दुर्गम व संवेदनशील अशा गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्ह्यांतही वीजजोडणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ४५५ घरांत प्रकाश
सौभाग्य योजनेतून दलित वस्तीत १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी ग्राम स्वराज अभियानात सोलापूर जिल्ह्यांतील सात गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरूख येथे २९ वीजजोडण्या, पंढरपूर तालुक्यातील आवे येथे १११ वीजजोडण्या, सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाडी येथे ६२ वीजजोडण्या, मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी येथे ९९ वीजजोडण्या, अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाल येथे ५२, हसापूर येथे ४३ व किरनाळी या गावात ५९ अशा जिल्ह्यात एकूण ४५५ वीजजोडण्या देण्यात आल्या. या सातही गावांतील सर्व घरांमध्ये वीज पोचली आहे.