नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आता दरमहा वीजग्राहक दिन
By appasaheb.patil | Published: July 16, 2019 06:24 PM2019-07-16T18:24:01+5:302019-07-16T18:25:19+5:30
महावितरणचा उपक्रम; मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता सहभागी होणार
सोलापूर : सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी बारामती परिमंडल अंतर्गत सर्व संवसु विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्यात वीजग्राहक दिन आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत. येत्या दि. २३ जुलैपासून या उपक्रमाला सुरवात होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, बार्शी, फलटण, पंढरपूर, सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या विभाग कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान वीजग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येईल. संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील.
कार्यकारी अभियंता सुटीवर किंवा दौºयावर असल्यास संबंधीत विभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हे काम पाहणार आहेत. तसेच एखाद्या महिन्याच्या तिसºया मंगळवारी शासकीय सुटी असल्यास, दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बारामती परिमंडलातील सर्व विभागांत जुलै महिन्याच्या चौथ्या मंगळवारपासून म्हणजेच दि. २३ जुलै २०१९ रोजी या उपक्रमाला सुरवात करण्यात येत आहे. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
----------
मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता सहभागी होणार
बारामती परिमंडलात येत्या २३ जुलैपासून आयोजित प्रत्येक महिन्यातील वीजग्राहक दिनाच्या उपक्रमाला सुरूवात होत आहे. प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे तसेच अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर हे कार्यालयीन दौºयादरम्यान विभाग कार्यालयात आयोजित या उपक्रमात सहभागी होऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत.