अवघ्या २ महिन्यांतच उभारले विजेचे उपकेंद्र; सोलापुरातील ३० हजार नव्या घरात प्रकाश पडणार

By Appasaheb.patil | Published: August 5, 2022 12:44 PM2022-08-05T12:44:22+5:302022-08-05T12:44:42+5:30

रे नगर प्रकल्प ; ३० हजार घरे होणार प्रकाशमान

Electricity substation set up in just 2 months; 30 thousand new houses in Solapur will get light | अवघ्या २ महिन्यांतच उभारले विजेचे उपकेंद्र; सोलापुरातील ३० हजार नव्या घरात प्रकाश पडणार

अवघ्या २ महिन्यांतच उभारले विजेचे उपकेंद्र; सोलापुरातील ३० हजार नव्या घरात प्रकाश पडणार

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी सोलापूर शहरालगत रे नगर येथे ३० हजार घरकुलांचा महाकाय प्रकल्प साकारला जात आहे. त्या घरांना प्रकाशमान करण्यासाठी महावितरणचे २० एमव्हीए क्षमतेचे ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र विद्युतवेगाने साकारले आहे. अहोरात्र काम करून अवघ्या दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिक व दुर्बल घटकांसाठी ३० हजार घरकुलांचा प्रकल्प मंजूर असून त्यांपैकी १०३०८ घरकुलांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या घरांना प्रकाशमान करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून महाराष्ट्रातील पहिले ३३/११ उपकेंद्र २३ मे २०२२ रोजी मंजूर करण्यात आले. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अमृत महोत्सवी वर्षाला साजेशी कामगिरी करत रे नगर उपकेंद्राला विक्रमी वेळेत पूर्ण करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला आहे.

-------

९६ रोहित्रे अन् ३० हजार घरांना वीज

रे नगरच्या नवीन उपकेंद्राला महापारेषणच्या कुंभारी उपकेंद्रातून ३३ केव्ही वाहिनीद्वारे वीज मिळणार आहे. त्यासाठी ६.१ किलोमीटर लांबीची उच्च दाब वाहिनी उभारण्यात आली आहे. तसेच उपकेंद्रातून १४.७५ कि.मी. लांबीची ११ केव्ही वाहिनी बाहेर पडणार आहे. या वाहिनीवर २०० केव्हीए क्षमतेची ९६ वितरण रोहित्रे घरांना प्रकाशमान करतील. दोन्ही उच्चदाब वाहिन्यांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.

-----------

संचालकांनी केली पाहणी, १२ ऑगस्टला चाचणी

युद्धपातळीवर सुरू असलेल्या या कामाची महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या १२ ऑगस्टला वीज उपकेंद्राची चाचणी होणार असून, इतक्या कमी कालावधीत प्रचंड क्षमतेचे उपकेंद्र पूर्ण करणे हा महावितरणसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

---------

रे नगरातील उपकेंद्राची चाचणी १२ ऑगस्टला घेण्याचे निर्देश त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना व कंत्राटदार एसीडीसी साईदीप बिल्डकॉन यांना दिले आहेत. कंत्राटदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

- संजय ताकसांडे, संचालक, महावितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य

 

 

Web Title: Electricity substation set up in just 2 months; 30 thousand new houses in Solapur will get light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.