एक महिन्याचे बिल थकले तरीही वीज होणार कट; महावितरणची वीज वसुली मोहिम वेगात
By Appasaheb.patil | Published: November 28, 2022 04:21 PM2022-11-28T16:21:55+5:302022-11-28T16:27:22+5:30
घरगुती ग्राहक सर्वाधिक थकबाकीदार; शेतीपंपाची थकबाकी मात्र सर्वात जास्त...
सोलापूर - वरवर सांगून आणि नोटीस पाठवूनही ग्राहक वीजबिल भरत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील विजेच्या थकबाकीचा आकडा ५७ हजार कोटींवर गेला आहे. दरम्यान, महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम वेगात सुरू केली आहे. सर्वाधिक थकबाकीदारात घरगुती ग्राहकांचा नंबर एक लागतो तर सर्वात जास्त थकबाकी शेतीपंप ग्राहकांची आहे. वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.
महावितरणची थकबाकी वाढलेली असून थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे. चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे म्हणून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे चालू असणार आहे. दरम्यान, शासनाने सांगितल्याप्रमाणे शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी आता सक्ती करण्यात येत नसल्याचेही सांगण्यात आले.
थकबाकीदार सर्व वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी वेबसाईट तसेच मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक,वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल ‘आरटीजीएस’ किवा ‘एनईएफटी’द्वारे थेट भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.