अवघ्या ४२ दिवसांत ४७० गावातील बदलले साडेअकरा हजार ट्रान्सफार्मर
By appasaheb.patil | Published: December 25, 2020 12:19 PM2020-12-25T12:19:08+5:302020-12-25T12:26:11+5:30
अतिवृष्टीतून महावितरण सावरले-दिवसरात्रं एक करून काम केल्याचे झाले चीज
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : अतिवृष्टी, पावसामुळे पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूरसह अन्य तालुक्यांतील झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे जिल्ह्यातील ४७० गावातील ११ हजार ३६३ विद्युत पोल वाहून गेले. यात शेतीपंपाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने रात्रंदिवस काम करून अवघ्या ४२ दिवसांत ११ हजार २४१ ट्रॉन्सफार्मर बदलून ४७० गावांतील दोन लाख वीज ग्राहकांचे घर प्रकाशमान करण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने अनेक गावांत पाणी शिरले. जिल्ह्यातील सिना, भीमा, नीरा, भोगावती, बोरी, हरणा नद्यांना पूर आला. एवढेच नव्हे तर सीना नदीला पूर आल्यानंतर पात्र बदलल्याने अनेक गावांत पाणी शिरले. परिणामी महावितरणने पोल अन् ट्रॉन्सफार्मर वाहून गेले; मात्र वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या विविध पथकांनी रात्रंदिवस काम करून ४७० गावांतील पुरवठा सुरळीत करण्यात मोठे यश मिळविले. यात कृषी व घरगुती वीजग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढेच नव्हे तर शेतातील विहिरीवर लावण्यात आलेले पंप पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
-------------
साडेबारा कोटींचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महावितरणचे १२ कोटी ५६ लाखांचे नुकसान झाले. यात सबस्टेशन, फिडर, ट्रान्सफार्मर, विद्युत खांब, मीटर, तारा व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ५००हून अधिक ट्रॉन्सफार्मर अद्याप गायब असल्याचेही महावितरण प्रशासनाने सांगितले.
------------
असे झाले महावितरणचे नुकसान
- ३३-११ केव्ही सबस्टेशन -६३३३-११
- केव्ही फिडरगावे-४७०
- ट्रॉन्सफर्मर-११ हजार ९३३
- एचटी पोल-३ हजार ८१०
- एलटी पोल-७ हजार ५५३
- एकूण नुकसान-१२ कोटी ५६ लाख
खंडित वीजग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने ठेकेदार, अभियंते, जनमित्र, वायरमन यांची विशेष पथके निर्माण केली होती. रात्रंदिवस काम करून पूरग्रस्त गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले. याच काळात वीजग्राहकांनी महावितरणला चांगले सहकार्य केले. अतिवृष्टीमुळे सोलापूर मंडलाचे १२ कोटी ५६ लाखांचे नुकसान झाले.
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल