रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडेपाच कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:36+5:302021-01-01T04:16:36+5:30
टेंभुर्णी (जि. सोलापूर): रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत पाच कोटी ५७ लाख रुपयांचा अपहार झाला ...
टेंभुर्णी (जि. सोलापूर): रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत पाच कोटी ५७ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. बँक प्रशासनाने तत्कालिन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू (रा. सांगोला) व तत्कालिन कॅशियर अशोक भास्कर माळी (रा. टेंभुर्णी) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी फिर्याद दिली आहे.
रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील तत्कालिन शाखा अधिकारी हरिदास राजगुरू व कॅशियर अशोक माळी या दोघांनी २०१६ ते २०२० या कालावधीत शाखेच्या बँक ऑफ इंडिया, शाखा टेंभुर्णी या बँकेच्या खात्यातील असलेली तफावतीची रक्कम एक कोटी ९२ लाख २५ हजार, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील बँकेच्या खात्यातील तफावतीची रक्कम दोन कोटी ४९ लाख ९० हजार, रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील प्रत्यक्ष उपलब्ध नसलेली हातावरील शिल्लक रकमेमधील तफावतीची रक्कम एक कोटी १४ लाख ८७ हजार ८२२ अशा एकूण पाच कोटी ५७ लाख २ हजार ८२२ इतक्या रकमेचा अपहार केला आहे.
तपासकामी दोन पोलीस पथके तयार केली आहेत. लवकरच आम्ही आरोपींना गजाआड करू, असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.