‘एसटी’चे रूपांतर ‘मालट्रक’मध्ये करण्यासाठी प्रवाशांचे सीट हटवून संकटकालीन मार्ग मोठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:12 AM2020-06-02T11:12:02+5:302020-06-02T11:14:28+5:30
दहा वर्षे पूर्ण झालेल्या गाड्यांचा वापर : व्यापारी अन् उद्योजकांसाठी ‘डोअर टू डोअर’चीही सोय
रूपेश हेळवे
सोलापूर : राज्यभरात ६०० एसटी डेपोच्या माध्यमातून प्रवाशांना आपल्याला हव्या त्या स्थळी पोहोचवणारी एसटी आता मालवाहतुकीच्या क्षेत्रात उतरली आहे. यासाठी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ प्रवासी वाहतूक करणाºया बसमधील सीट काढून अंतर्गत बदल करून याचे ट्रकमध्ये रुपांतर करण्यात येत आहे.
राज्य परिवहन महामंडळ यंदापासून मालवाहतुकीच्या क्षेत्रातही पाऊल टाकत आहे. यासाठी प्रत्येक विभागातून एसटीच्या मालवाहतूक गाड्या तयार करण्यात येत आहेत. सध्या प्रत्येक विभागातून तात्पुरत्या स्वरुपात काही मालवाहतूक गाड्या तयार करण्यास सांगितले आहे. यानुसार सोलापूर विभागात ही सध्या दोन गाड्यांचे रुपांतर मालवाहतुकीमध्ये करण्यात येत आहे.
ज्या गाड्यांची दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा साडेसहा लाख किलोमीटर गाडी पळाली असेल अशा गाड्यांचे रुपांतर आता मालवाहतुकीमध्ये करण्यात येत आहे. सोलापूर आगारातील दोन गाड्यांचे रुपांतर सुरू असून या गाड्यांमधील सर्व सीट काढून खिडक्या पूर्णपणे बंद करण्यात येत आहेत.
याचबरोबर पुढील दरवाजा पूर्णपणे वापरण्यास बंद करून चालकांसाठी केबीनची व्यवस्था आत असणार आहे. याचबरोबर यासाठी माल टाकण्यासाठी मागच्या दरवाजा बनवण्यात येणार आहे.
या मालवाहतूक ट्रकमधून ज्वलनशील पदार्थ सोडून सर्व प्रकारची माल वाहतूक करण्यासाठी परवानगी असणार आहे. यात शेतीमाल ते मोठी अवजारे हे यामधून घेऊन जाता येणार आहे. सोलापूर आगारातील कुर्डूवाडी आगारातील एक ट्रकने मालवाहतुकीस सुरुवात करण्यात आली असून कुर्डूवाडीहून पुणे येथे भाजीपाला घेऊन गेले तर सांगोलाच्या आगारात मोहोळ ते कुर्डूवाडीपर्यंत पीयूसी पाईप घेऊन जाण्यासाठी गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.
एसटी प्रशासनाच्या या निर्णयाचा शेतकºयांना चांगला फायदा होणार आहे. याचबरोबर एसटी प्रशासनाकडे मुबलक व्यवस्था असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यासाठी आठ टनापर्यंत माल घेऊन जाण्यास परवानगी असणार आहे. या मालवाहतुकीसाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर या क्षेत्रातील माहिती असणाºया कर्मचाºयांची यात निवड करण्यात येणार असून याचे प्रमुख विभाग नियंत्रक असणार आहेत.
मागील भागात केला बदल!
- आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांना एसटीमधून बाहेर पडण्यासाठी बनविण्यात आलेल्या एक्झीट डोअर हेच आता मालवाहतुकीचे एन्ट्री पॉर्इंट असणार आहे. एसटीच्या मागील भागात बदल करून येथून माल आत टाकण्यात आणि बाहेर काढण्यात येणार आहे.यासाठी सध्या लहान आणि मोठ्या असे दोन स्वरूपाचे दरवाजे बनवण्यात येत आहेत.
सोलापूर विभागातून सध्या दोन गाड्या बनवण्यात येत आहेत. या मालवाहतुकीला प्रतिसाद बघून भविष्यात आणखी जादा गाड्यांची वाढ करण्यात येणार आहे. यासाठी सध्या बाजारभावापेक्षा कमी दर असणार आहे. याचबरोबर डोअर टू डोअर सर्व्हिस देण्यात येणार आहे. यामुळे याचा लाभ उद्योजकांसह सर्वांना होणार आहे.
- डी. जी. चिकोर्डे, यंत्र अभियंता, सोलापूर