चिमुरडींचे भावनिक पत्र; पप्पा काळजी घ्या... तुमची खूप आठवण येतेय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:44 AM2020-04-21T11:44:08+5:302020-04-21T11:45:17+5:30
अशीही काळजी: वैद्यकीय अधिकारी असलेल्या पित्याला चिमुरडींचे भावनिक पत्र
महेश कुलकर्णी
कुरुल : मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विनोद अभिवंत यांना त्यांच्या दोन लहान मुलींनी भावनात्मक पत्र लिहून खुशाली कळवली आहे़ ‘पप्पा. तुमची खूप आठवण येते.. तुम्हाला भेटावंसं वाटतंय़.. पण, कोरोनामुळे तुम्ही घरी येऊ शकत नाही.. तरीही तुम्ही तुमची काळजी घ्या’ असे भावनिक पत्र डॉक्टर पित्यासाठी त्यांच्या दोन लहान चिमुकल्यांनी लिहून पाठवले आहे.
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांच्या काळजीप्रति डॉक्टर वैद्यकीय तपासणी करून सेवा करीत आहेत, पोलीस प्रशासन जनजागृती करून जमावबंदीची अंमलबजावणी करून लोकांना घरीच थांबण्यास भाग पाडत आहेत. लहान मुले वडिलांच्या आगमनाची प्रतीक्षा करताहेत.
डॉ. विनोद अभिवंत हे मोहोळ तालुक्यातील देवडी येथील असून, सध्या निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अंकोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहेत. लहान मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचे कुटुंब सोलापूर येथे राहते.
डॉ. अभिवंत आठवड्यातून एक-दोनदा सोलापूरला जातात. त्यांना तनिष्का (चौथी) व आराध्या (पहिली) अशा दोन मुली आहेत. ग्रामीण भागातील सर्दी, खोकला, ताप व अन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण वाढले असल्याने डॉ. अभिवंत हे पंधरा दिवसांपासून घरी गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या दोन्ही लहान मुलींनी आपल्या वडिलांना उद्देशून पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे तुम्ही घरी आला नाहीत. सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. तुम्ही जेवता कसे? असे अनेक प्रश्न या चिमुकल्यांनी पत्रातून केले आहेत़
आपण कोरोनाला पळवून लावू
- त्या भावनिक पत्रात या मुलींनी या काळात आपला हट्ट बाजूला ठेवल्याचे सांगतात़ त्या म्हणतात ‘हा कोरोना कधी संपायचा आणि कधी आम्ही तुमच्या कुशीत येणार? पप्पा, तुम्ही तुमची काळजी घ्या. आमचा खाऊ संपला तर संपू द्या. पण तुम्ही घरी लवकर या. कोरोनामुळे तुम्ही बाहेरून डब्बापण मागवू शकत नाही? मग जेवण कसे करणार? हे आठवल्यावर आम्हाला जेवण जात नाही, म्हणून मी आणि आराध्या प्रार्थना करतो की, आपण सगळे जण मिळून कोरोनाला पळवून लावू. तुमच्या लाडक्या आराध्या व तनिष्का.