आरोग्य राखण्यावर दिला जातोय भर; म्हणूनच ढेरपोटे पोलिसांच्या संख्येत घट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 10:54 AM2021-09-09T10:54:51+5:302021-09-09T10:54:57+5:30
कामाच्या अनिश्चित वेळेतही व्यायाम : आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांची दिनचर्या बदलली
साेलापूर : पोलीस खात्यात काम करत असताना गुन्हा दाखल करण्यापासून आरोपीचा शोध घेण्यापर्यंत अनेक कामे पोलिसांना करावी लागत असतात. कामाची अनिश्चित वेळ असली तरी बहुतांश पोलिसांनीआरोग्य सांभाळले आहे, त्यामुळे ढेरपोटे पोलिसांची संख्या शहर पोलीस आयुक्तालयात कमी आहे. शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे २२०० पोलीस कर्मचारी आहेत. सात पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांना ड्युटीवर असताना गुन्हा घडला की, घटनास्थळी जावे लागते. पंचनामा करणे, फिर्यादीला पोलीस ठाण्यात बोलावून गुन्हा दाखल करणे, गुन्ह्याचा तपास कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडे देणे या सर्व गोष्टीसाठी वेळ जातो. १२ तास ड्युटी असलेल्या पोलिसांना बऱ्याचवेळा १४ तास, १६ तास ड्युटी करावी लागते. दिवसभराची ड्युटी झाली तरी बऱ्याचवेळा रात्रपाळी करावी लागते. रात्रपाळी जरी केली तरी सकाळी पुन्हा लगेच पोलीस स्टेशनला हजर व्हावे लागते. अशा परिस्थितीतही १ हजार ४०८ पोलिसांनी स्वत:ला फिट ठेवले आहे.
घरच्यांना वेळ देता येत नाही
कामे इतकी येतात की, आम्हाला दिवस कधी संपला रात्र कधी झाली समजत नाही. घरून पत्नीचा, मुलांचा फोन येत असतो. त्यांना येतो असेच सांगावे लागते मात्र कधी येणार हे सांगता येत नाही. काम संपल्यानंतरही समाधानाने घरी जाता येत नाही, कारण कधी काय काम लागेल याची धास्ती असते. तरीही सकाळी जमेल तेवढा व्यायाम करत असतो.
पोलीस कर्मचारी
दिवाळी असो किंवा राखी पौर्णिमा घरी बहीण येऊन बसते. तिला माझी वाट पाहात बसावे लागते. मुलाचा वाढदिवस असो किंवा अन्य कोणताही सण घरातील मंडळी फोन करून घरी कधी येता? याची विचारणा करतात. ड्युटी झाली तरी घरी जाऊन कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. झोप न झाल्याने व्यायाम करायचा केव्हा? असा प्रश्न पडतो.
^ पोलीस कर्मचारी
^ पोलीस स्टेशनमध्ये काम करीत असताना कधी काय काम लागेल सांगता येत नाही. एका कामात गुंतले की ते पूर्ण करताना वेळ कसा निघून जातो समजत नाही. भूक लागली तरी वेळेवर जेवण करता येत नाही. डबा जरी आणला तरी तो उघडून खाता येत नाही. रात्री उशीर होतो, जागरण होते मात्र सकाळी किंवा सायंकाळी मिळेल त्या वेळेत व्यायाम करतो.
पोलीस कर्मचारी
पोलीस कर्मचाऱ्यांचे शरीर तंदुरूस्त रहावे यासाठी नियमितपणे बॉडीमास इंडेक्सनुसार आरोग्याची तपासणी केली जाते. वय, उंची प्रमाणे वजन आहे की नाही हे पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेतले जाते. हे प्रमाणपत्र शासनाकडे पाठवतो, पोलिसांचे शरीर फिट रहावे यासाठी महिन्याला २५० रुपयाचा प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्याला निरोगी व फिट राहण्याच्या सूचना दिल्या जातात.
डॉ. दीपाली धाटे, पोलीस उपायुक्त
प्रोत्साहन भत्त्यासाठी १४०८ अर्ज
- शहर पोलीस आयुक्तालयातील १४०८ कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन भत्त्यासाठी अर्ज केले आहेत. तर बहुतांश कर्मचाऱ्यांनी २५० रूपयात काय होते असा विचार करून अर्ज केला नसावा. मात्र ६० ते ७० टक्के कर्मचाऱ्यांनी आपले शरीर फिट ठेवले आहे.