जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलनात, कार्यालयात अधिकारी निवांत
By संताजी शिंदे | Published: March 14, 2023 07:31 PM2023-03-14T19:31:36+5:302023-03-14T19:31:44+5:30
बेमुदत बंदमुळे लोकांनीही शासकीय कार्यालयात जाण्यच टाळलं
सोलापूर: जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी वर्ग-२ ते वर्ग-४ मधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता, त्यामुळे सर्व कार्यालयात शुकशुकाट होता. वरिष्ठ अधिकारी आपल्या खुर्चीवर बसून होते, सर्वांना सुट्टी असल्याचा अनुभव येत होता. दिवसभरात लोकांनीही जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात येण्याचे टाळले.
नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता सुरू झाले, मात्र पदोन्नतीने गेलेल्या वर्ग-२ मधील अधिकाऱ्यांसह चतुर्थश्रेणी प्रवर्गातील कर्मचारी आले नाहीत. सकाळच्या सत्रात काही लोक कामा निमित्त आले होते, मात्र तिथे फक्त अधिकारी उपस्थित होते. मुळ काम करणारे कर्मचारी व अधिकारी संपात गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आलेले नागरिकही आज आपले काम होणार नाही याची खात्री करून परत गेले. नेहमी वर्दळ आणि कामानिमित्त गर्दी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात शुकशुकाट दिसत होता. कार्यालयातही अधिकारी सोडले तर सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या.
अपर जिल्हाधिकारी, गौण खनिज विभाग, पुरवठा विभाग, उपविभागीय अधिकारी क्र.१ व २, नरगभूमापन कार्यालय, ग्रामपंचायत निवडणूक कार्यालय, पुर्नवसन, जिल्हा निवडणूक अधिकारी, नगर विकास, गृह विभाग, संजय गांधी निराधार, दुय्यम निबंधक कार्यालय, दक्षिण तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारतीमधील कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, मत्य विभाग, सिटी सर्व्हे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यासह जिल्हा कोषागार मध्येही शुकशुकाट होता. सर्वत्र नेहमी प्रमाणे गर्दी दिसून येत नव्हती.
शिपाई लिपिक कोणी नाही, फाईल काढून देणार कोण?
कार्यालयात अधिकारी उपस्थित होते, मात्र त्यांना काम करण्यासाठी आवश्यक असलेली फाईल देणार कोण अशी स्थिती निर्माण झाली होती. रोजच्या कामाची माहिती असलेले कर्मचारीची आंदोलनात गेल्याने काही अधिकाऱ्यांची पुरती पंचायत झाली होती. काही अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन फाईली शोधण्याचा प्रयत्न केला तर काहींनी निवांत राहण्यात धन्यता मानली.