कर्मचारी वेळेवर येईनात, 'बायोमेट्रीक' पाहूनच पगार
By शीतलकुमार कांबळे | Published: February 27, 2023 10:09 PM2023-02-27T22:09:29+5:302023-02-27T22:10:29+5:30
सीईओ कोहिनकरांचे आदेश : मार्चपासून अंमलबजावणी
शीतलकुमार कांबळे, सोलापूर: जिल्हा परिषद मुख्यालयात बहुतेक कर्मचारी हे वेळेवर कामासाठी येत नाहीत. त्यांनी वेळेवर यावे व कार्यालयीन वेळेत कार्यालयातच रहावे, यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली असून, त्यानुसारच त्यांचा पगार होणार आहे. सीईओ संदीप कोहिनकर यांनी हा आदेश दिला आहे. कार्यालयीन वेळेत कार्यालयात कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र, तसे प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे नाव बायोमेट्रिक प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.
कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मासिक वेतन अदा करण्याची प्रक्रिया ही २१ तारखेपासून चालू महिन्याच्या २० तारखेपर्यंत होत असते. ही प्रक्रिया करताना बायोमेट्रिक प्रणालीचा अहवाल तपासण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी जितके दिवस काम करतील, तितके दिवसांचाच पगार त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
कर्मचारी हे रजा, फिल्ड वर्क किंवा इतर कामानिमित्त बाहेर असतात. या परिस्थितीत त्याच्या नोंदी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवणे गरेजेचे आहे. या कर्मचाऱ्यांची प्रणालीमध्ये गैरहजेरीची नोंद होऊ नये यासाठी काळजी घेण्यास सांगितले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"