सोलापूरातील ‘स्वामी समर्थ’ साखर कारखान्यांवर अवसायकाची नियुक्ती, संचालकांचा खुलासा अमान्य, बंद कारखान्यावर कर्जाची रक्कम वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:04 PM2018-01-25T13:04:40+5:302018-01-25T13:05:41+5:30
संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : संचालक मंडळाच्या वतीने दिलेला खुलासा फेटाळत अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा आदेश प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कायम केला आहे.
स्वामी समर्थ कारखान्यावरील कर्जाची थकबाकी वाढल्याने व साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून अवसायक नेमण्याचा अंतरिम आदेश ६ आॅक्टोबर २०१७ रोजी काढला होता. प्रादेशिक सहसंचालक(साखर) यांनी ही कारवाई करीत अवसायकाची नेमणूक केली होती. जिल्हा बँक व कारखान्याला म्हणणे सादर करण्याची संधी दिली होती. जिल्हा बँकेच्या वतीने सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी दिलेल्या खुलाशात कारखान्याने घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी अवसायक नेमल्यास अडचण येणार असून कर्ज बुडीत होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मागील पाच वर्षे आलेली नैसर्गिक आपत्ती, शेतीतील झालेल्या उत्पन्नात घट व अन्य कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याने अवसायक नेमणे अयोग्य असल्याचे जिल्हा बँकेच्या खुलाशात म्हटले आहे.
साखर कारखान्याच्या वतीने माजी अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी संस्था मोडकळीस आणणे योग्य होणार नाही, अवसायक नेमल्याने शेतकरी ऊस उत्पादकांचे नुकसान होणार आहे असे म्हटले आहे. अवसायक न नेमता कारखाना सुरू करुन बँकांची देणी वरचेवर कमी करणे व एफ.आर.पी. ची रक्कम देणे सोयीचे होण्यासाठी अवसायक नेमू नये असे खुलाशात पाटील यांनी म्हटले होते. कारखान्याच्या वतीने दिलेला खुलासा व जिल्हा बँकेचे म्हणणे फेटाळत अक्कलकोटच्या स्वामी समर्थ कारखान्यावर अवसायक नेमण्याचा आदेश कायम केला आहे. कारखान्याचे अवसायक (परिसमापक) म्हणून महाराष्टÑ राज्य सहकारी बँक प्रमोद देशमुख यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.
----------------------
संतनाथ नंतर स्वामी समर्थ
च्वैरागच्या संतनाथ साखर कारखान्यावर यापूर्वीच अवसायक नेमला आहे. शंकर साखर कारखान्याचे प्रकरण न्यायालयात लटकले आहे. स्वामी समर्थ कारखान्यावर मात्र अवसायक नेमण्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालकांनी घेतला आहे. एकीकडे जिल्ह्यात ४० वा साखर कारखाना अक्कलकोट तालुक्यात उभारला जात असताना याच तालुक्यातील पहिला साखर कारखाना आर्थिक अडचणीत अडकला आहे.