शहरात अतिक्रमणाची धडक मोहीम बोअर चालकांना तंबी :
By admin | Published: May 11, 2014 12:57 AM2014-05-11T00:57:43+5:302014-05-11T00:57:43+5:30
दत्तनगर, गवईपेठ, रविवारपेठ, पाच्छापेठ भागात कारवाई
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील दत्तनगर, गवईपेठ, रविवारपेठ, पाच्छापेठ येथील अतिक्रमण काढण्यात आले. दत्तनगर येथील खासगी बोअर चालकांना तंबी देऊन पाणी विकण्यास मनाई करण्यात आली. तसेच या ठिकाणी रस्त्यावर थांबणार्या पाणी वाहतुकीच्या टँकरना ताकीद करण्यात आली. गेल्या आठवड्यात पाच्छापेठ येथे पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत शाळकरी मुलगा ठार झाला होता. याची दखल घेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शनिवारी सकाळी या परिसराची पहाणी केली. आंध्र दत्त चौकात खासगी पाणी विक्री करणार्या ठिकाणाला भेटी देऊन आयुक्तांनी संबंधितांना ताकीद दिली. तसेच या ठिकाणी थांबणार्या पाण्याच्या टँकरना कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पहाणी केली असता या भागात अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यांनी तत्काळ अतिक्रमण विभागाला आदेश देऊन ते काढण्यास सांगितले. त्यानुसार अतिक्रमण विभागाने ११ वाजता अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. या कारवाई दरम्यान खासगी बोअरमधून पाण्याची विक्री करणार्या मालकांचे रस्त्यावरील अतिक्रमण काढले. त्यानंतर दत्तनगर परिसरात समोर आलेले अतिक्रमणही पाडण्यात आले. गवईपेठ येथे महापालिकेच्या रस्त्यावर खासगी बोअर मालकाने पाणी विक्रीसाठी बांधलेले हौद जमीनदोस्त करण्यात आले. तसेच रविवारपेठ व पाच्छापेठ येथील समोरच्या बाजूला करण्यात आलेले अतिक्रमण पाडण्यात आले. अतिक्रमण विभागाच्या या कारवाई प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.डी. जाधव, बाळासाहेब भोसले, एन.एन. बाबर, प्रभाकर काडगी आदी कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------
अन् कॅन्टीनचे अतिक्रमण काढले... आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सकाळी ६.३0 वा. दत्तनगर येथील अतिक्रमणाची पहाणी केली. दरम्यान त्यांनी याच ठिकाणी असलेले सरगम टी अॅन्ड कोल्ड्रिंक्स वर जाऊन चहा घेतला होता. मात्र दुपारी त्याच कॅन्टीनचे अतिक्रमण काढण्यात आल्याने सर्वत्र एकच चर्चा होती.
------------------------------------------------------
आयुक्तांच्या आदेशावरून या परिसरातील १0 ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकाम, रस्त्यावरील अतिक्रमण काढले असून ही कारवाई चालूच राहणार आहे. नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घ्यावे. - आर.डी. जाधव, उपअभियंता, महानगरपालिका,