लिंगायत स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:50+5:302021-06-11T04:15:50+5:30
येथील लिंगायत समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माढा येथील उपअधीक्षक कार्यालयाकडील रेकॉर्डप्रमाणे पिंपळनेर येथे सिटी सर्व्हे ...
येथील लिंगायत समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माढा येथील उपअधीक्षक कार्यालयाकडील रेकॉर्डप्रमाणे पिंपळनेर येथे सिटी सर्व्हे गट नंबर ७८८ मध्ये क्षेत्र ७५८६ चौरस मीटर अशी लिंगायत समाजाची नोंद असलेली जागा आहे. या जागेचे मालक महाराष्ट्र शासन आहे. तरी या जागेच्या प्रवेशद्वारावरच येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून काम करणारे भारत सोपान लोखंडे याने घर बांधकाम केले आहे. त्यामुळे या बांधकामामुळे स्मशानभूमीत घेऊन जायला अडथळा निर्माण होत आहे.
याबाबत स्थानिक पातळीवर असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाकडेही लेखी कळविले आहे. मात्र काहीही त्यांनी कारवाई केली नाही. ते कर्मचाऱ्याची पाठराखण करीत आहेत. सदरचे अतिक्रमण केलेले बांधकाम त्वरित पाडावे व लिंगायत समाजाला न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
-
पिंपळनेर येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत अतिक्रमण केलेली व्यक्ती ही आमच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. याबाबत लिंगायत समाजाची आमच्याकडे तक्रार आल्यानंतर लगेच त्याला नोटीस बजावली आहे. अतिक्रमण केलेल्या व्यक्तीच्या मालकीची जागाही तिथेच आहे. हद्दखुणा ग्रामपंचायतला माहीत नसल्याने हा गोंधळ झाला आहे. मोजणी करून निर्णय घेण्यात येईल.
- ए.टी. शिंदे, ग्रामविकास अधिकारी, पिंपळनेर
-----