‘मकाऊ’ मेल्याच्या विरहाने मादीचाही अंत; सोलापूर प्राणीसंग्रहालयातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 03:32 PM2021-10-15T15:32:37+5:302021-10-15T15:32:50+5:30
शवविच्छेदन : दुसऱ्या पोपटाच्या अहवालात कारण अस्पष्टच
सोलापूर : मृत मकाऊ नर पोपटाचा शवविच्छेदन अहवाल महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास पाठविण्यात आला आहे. या अहवालात मृत पोपटाच्या शरीरात अन्न आणि पाणी नसल्याने त्याचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष निघतो, असे शवविच्छेदन करणारे जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे डॉ. फारुख बागवान यांनी ‘लोकमत’ला सांगितले, तर मादीचा मृत्यू नराचा विरह सहन न झाल्याने झाला असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मादी मकाऊ पोपट मरण्याच्या दहा दिवसांपूर्वी नर पोपटाचा मृत्यू झाला होता. या नर पोपटाच्या शवविच्छेदन अहवालात शरीरात अन्न-पाणी नसल्याने मृत्यू झाल्याने नमूद करण्यात आले आहे, तर दहा दिवसाने रविवार १० ऑक्टोबर रोजी मृत झालेल्या मादीच्या शरीरातील महत्त्वाची सर्व इंद्रिये सडलेल्या अवस्थेत होती. मकाऊ पक्षाच्या शरीराचे तापमान जास्त असल्याने मृत झाल्यावर त्याचे शरीर जलदगतीने सडते. त्यामुळे नेमक्या कोणत्या आजाराने त्याचा मृत्यू झाला, हे शवविच्छेदन करूनही स्पष्ट झाले नसल्याचे डॉ. फारुख बागवान यांनी सांगितले.
-----
पाच वर्षांपासून राहायचे एकत्र
पक्ष्यांंमध्ये सहजीवन जगताना जोडीदारांपैकी एकाचा मृत्यू झाला की दुसरा विरह सहन न झाल्याने अन्नपाणी घ्यायचे सोडून देतो. मागील पाच-सहा वर्षांपासून नर मादी एकत्र राहात होते. या जोडीतील नर सोडून गेल्याने मादीने अन्नपाणी सोडले. त्यामुळे मादीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वन्यजीव व पक्षीमित्र डॉ. प्रतीक तलवाड यांनी व्यक्त केली. शवविच्छेदन करण्यास उशिरा दाखल करून मृत्यूचे नेमके कारण निष्पन्न होऊ नये, यासाठी उशिरा दाखल केल्याचा संशय बळावतो, असा आरोप पक्षीमित्र ॲड. प्रकाश अभंगे यांनी केला.
----------
नराच्या मृत्यूनंतरही मादीकडे दुर्लक्ष
दहा दिवसांपूर्वी नर अन्न-पाण्याविना मृत पावला, हे शवविच्छेदन अहवालातून कळले होते. तरीही प्राणिसंग्रहालय प्रशासनाने जिवंत असलेल्या मादीकडे लक्ष दिले नाही. मंगळवारी ‘लोकमत’ने मकाऊच्या मृत्यूची बातमी प्रसिध्द करून शवविच्छेदनाविना पक्षी सिद्धेश्वर वन विहारच्या पिंजऱ्यात पडून असल्याचे छायाचित्रातून दाखविले. त्यानंतर प्राणी संग्रहालयाचे ॲनिमल किपर भारत शिंदे यांनी दिलेल्या पत्रानुसार हैदराबाद रोडवरील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयात मृत मकाऊ पक्षाला शवविच्छेदनासाठी आणले. तिथे सोमवारी पक्षी मृत झाल्याची नोंद केली गेली.
--------