मार्चअखेर ; सोलापूर जिल्ह्यातील जमा-खर्चाच्या लेखांची पडताळणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:46 PM2018-03-23T12:46:40+5:302018-03-23T12:46:40+5:30
जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी कोषागार कार्यालयात जाऊन केली पाहणी, घेतला कामाचा आढावा
सोलापूर : मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा मुख्य कोषागार कार्यालयाला भेट दिली. जिल्ह्यातील जमा-खर्चाच्या लेखांची पडताळणी केली.
जिल्हाधिकारी दरवर्षी कोषागार कार्यालयाची पाहणी मार्च महिन्यात करत असतात. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे कोषागार कार्यालयात दाखल झाले. कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे, सहायक कोषागार अधिकारी सुर्यकांत खटके उपस्थित होते.
डॉ. भोसले यांनी मुद्रांकाची पाहणी केली. सर्व विभागाच्या वित्तपेट्या, मौल्यवान वस्तूंच्या पेट्या, निवडणूक पेट्या यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. कोषागार कार्यालयाची यंत्रणा कशा प्रकारे चालते. आॅनलाईन यंत्रणा कशा प्रकारे हाताळली जाते याचे प्रात्यक्षिक घेतले. कदम यांनी यंत्रणा युझर फ्रेंडली असल्याचे निदर्शनास आणून दिले.
रात्री उशिरापर्यंत काम सुरु
- मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच कोषागार कार्यालयातील कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत काम करत आहेत. झीरो पेन्डन्सी धोरणानुसार काम रोजच्या रोज पूर्ण केले जात आहे. या कामकाजाबाबत डॉ. भोसले यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अभिलेख कक्ष, निवृत्तीवेतन विभाग, ग्रंथालय, धनादेश विभाग आदी विभागांना भेट देऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्वांचा निरोप घेतला.
अग्निशमन यंत्रणेचे प्रात्यक्षिक
- भेटीदरम्यान डॉ. भोसले यांनी कार्यालयातील अग्निशमन यंत्रणेचे प्रात्यक्षिक घेतले. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अग्निरोधक चाचणी डॉ. भोसले यांनी घेतली. आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज राहावे, अशी सूचना त्यांनी सर्वांना केली.