पानटपरी बंद करून शेतीत गुंतला अन् वर्षात लिंबूविक्रीतून तीन लाखांचे उत्पन्न घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 01:10 PM2020-03-02T13:10:50+5:302020-03-02T13:16:01+5:30
कुर्डूवाडीतील तरुण शेतकºयाची यशोगाथा; एका वर्षात सुमारे ७५० डाग लिंबाचे उत्पादन घेतल
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : वयाच्या सोळाव्या वर्षी एका पानटपरीच्या व्यवसायात उतरून जीवनाला सुरुवात केली...अनेक उद्योग क्षेत्रात राहूनही वडिलोपार्जित शेतीकडे वळले.. बघता-बघता एक प्रयोगशील तरुण शेतकरी म्हणून नावलौकिकही झाला..पाच वर्षांपूर्वी दीड एकरात लिंबाची १५० झाडं लावली..रासायनिक खतांची मात्रा न देता वर्षभर सेंद्रिय खताची योग्य मात्रा दिली़. उत्कृष्ट नियोजनाद्वारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे कुर्डूवाडी येथील तरुणाने.
विशाल चंद्रकांत गोरे असे त्या अवलिया शेतकºयाचे नाव. त्यामुळे ते सध्या एक प्रयोगशील शेतकरी म्हणून चर्चेत आहेत. कुर्डूवाडी शहराच्या हद्दीत ढवळस रोडवर विशाल गोरे यांची दीड एकर लिंबाची बाग आहे. ते स्वत: पदवीधर आहेत. लिंबाच्या बागेत ते दरवर्षी जून- जुलै महिन्यात अंतर्गत मशागत करतात. प्रथम जमिनीची खननी करून घेतली. त्यानंतर त्याची बांधणी केली. त्यामध्ये सेंद्रिय खताची मात्रा दिली. तसेच अधिकप्रमाणात शेणखत वापरले. बाग सध्या सहा वर्षांची आहे.
बागेतील लिंबूच्या झाडांना इनलाईन ड्रीपच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला़ यासाठी एका बोअरची सुविधा उपलब्ध केली आहे. एका वर्षात सुमारे ७५० डाग लिंबाचे उत्पादन घेतले. शेती विभागात अग्रेसर असलेले गोरे हे इतर उद्योगातही अग्रेसर आहेत. त्यांच्या प्रयोगशील कार्यात त्यांच्सया कुटूंबानेही योगदान दिले आहे़ त्यांनी वीटभट्टीसारखे उद्योगधंदेही नावारूपाला आणले आहेत. त्याचबरोबर ते एका सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक बांधिलकी म्हणून कु र्डूवाडीत सामाजिक उपक्रम राबवताहेत़ शेतीविषयक असणारे प्रेम त्यांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ठरले.
शेतीप्रयोगाबाबत विशाल गोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी लागवडीतले बारकावे सांगितले़ शेती करताना अभ्यासूवृत्ती बाळगण्याचे आवाहन त्यांनीर केले़ ते म्हणाले, लहानपणापासून उद्योग क्षेत्रात करिअर करीत आहे. कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नाही हे लक्षात घेऊन प्रथम एका पानटपरीच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. वीटभट्टी सारख्या उद्योगात काम करीत आहे. पण पारंपरिक शेती व्यवसायात खूप आवड असल्याने सेंद्रिय पद्धतीने बाग जोपासण्याचा प्रयोग केला. त्यातून भरघोस नफा मिळाला आहे.यापुडे शेतकºयांनी प्रयोग केल्याशिवाय उत्पन्न नाही.
स्थानिक बाजारपेठेने दिला १५० रुपयांचा दर
सेंद्रिय शेती आणि ड्रीपद्वारे केलेल्या प्रयोगातून दीड एकरात ७५० डाग लिंबू निघाले़ त्याला कुर्डूवाडी येथील बाजारपेठेने चांगला दर दिला़ वार्षिक लागवड खर्च चाळीस हजार रुपये आला. लिंबूचे दर ऋतूनुसार बदलतात, तरीही कमीतकमी शंभर ते जास्तीत जास्त दीड हजार रुपये उच्चांकी दर त्यांना मिळाला़ त्यातून वर्षाकाठी खर्च वगळता सुमारे तीन लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. हा प्रयोग करत असताना अल्ताफ मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले.