अभियंत्यांची उत्कृष्ट बांधणी; उजनीची राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:42 PM2020-09-15T14:42:55+5:302020-09-15T14:44:56+5:30

अभियंता दिन विशेष; सोलापूरच्या सुपुत्रांनी सांभाळली संपूर्ण बांधकामाची धुरा

Engineer Day Special; Ujjain has the highest storage capacity in the state | अभियंत्यांची उत्कृष्ट बांधणी; उजनीची राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता

अभियंत्यांची उत्कृष्ट बांधणी; उजनीची राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरण हे एक बहुउद्देशीय धरण असून सिंचनाबरोबरच अनेक गोष्टी यातून साध्य झाल्या आहेतजपान तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक असा १२ मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वितभीमा- सीना नदी जोड बोगदा खोदून सीना नदीत पाणी सोडून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : राज्यात सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेले उजनी गावच्या उजाड माळरानावर साकारलेले एक स्वप्न म्हणजे उजनी धरण होय. अभियंत्यांनी आपल्या कल्पनेतून साकारलेला उत्तम नमुना म्हणावा लागेल. धरणाच्या संपूर्ण बांधकामाची धुरा सांभाळलेले तत्कालीन अधीक्षक अभियंता हे सोलापूरचे सुपुत्र होते याचा अनेकांना विसर पडला असेल.

इंग्रजी सत्ता असताना उजनी धरणाचा एक वेळ सर्व्हे झाला होता. त्यानंतर स्वातंत्र्याच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सन १९६४ साली धरणाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली. धरणाचे बांधकाम सलग ११ वर्षे चालले. या संपूर्ण बांधकामाची धुरा त्यावेळचे अधीक्षक अभियंता व सोलापूरचे सुपुत्र रस्ते यांच्यावर सोपवली होती. बांधकामास १९६९ साली प्रारंभ झाला व १९८० साली बांधकाम पूर्ण झाले. खरे अ‍ॅन्ड तारकुंडे कंपनीने बांधकाम केले. परंतु संपूर्ण बांधकामाची देखरेख रास्ते यांनी केली.
प्रारंभी ४० कोटी खर्चास मंजुरी मिळालेल्या धरणाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ९६.७७ कोटी खर्च झाला. २७ सप्टेंबर १९८० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी उजनी धरणाचे लोकार्पण केले व १९८१ पासून धरणात पाणी साठवण्यास प्रारंभ झाला. 

आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा
उजनी धरण हे एक बहुउद्देशीय धरण असून सिंचनाबरोबरच अनेक गोष्टी यातून साध्य झाल्या आहेत. धरणाच्या पायथ्याशी जपान तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक असा १२ मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. तसेच १९ किलोमीटर लांबीचा भीमा- सीना नदी जोड बोगदा खोदून सीना नदीत पाणी सोडून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. दोन नद्यांना जोडणारा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा समजला जातो.

एक दृष्टिक्षेप
१२३ टीएमसी प्रचंड  साठवण क्षमता असलेल्या धरणाच्या दगडी भिंतीची उंची ५६.४० चाळीस मीटर तर लांबी ९१४ मीटर आहे. मातीच्या भिंतीची उंची ३९.१० मीटर तर लांबी १६२६ मीटर आहे. धरणाची एकूण लांबी २५४० मीटर एवढी आहे. उजनी धरणास १२७६  मीटरचे एकूण ४१ दरवाजे आहेत तर ४ गार मोरी आहेत. उजनी धरणात १२६ किलोमीटर लांबीचा डावा  व ११२ किमी लांबीचा उजवा असे दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याद्वारे १,३३,३३२ हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ७१,९४५ हेक्टर एवढे क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

Web Title: Engineer Day Special; Ujjain has the highest storage capacity in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.