सोलापूर जिल्ह्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ‘बाटू’ला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:32 PM2018-08-21T14:32:12+5:302018-08-21T14:37:07+5:30
सोलापूर विद्यापीठ : १५ पैकी ८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण; २ हजार २४० जागांचे वाटप
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १५ पैकी यंदा ८ अभियांत्रिकी महाविद्यालयांचे संलग्नीकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (बाटू) झाले आहे. यंदाच्या वर्षी थेट द्वितीय वर्ष पदवी प्रवेशाच्या तिसºया फेरीत विद्यार्थ्यांनी बाटूला सर्वाधिक पसंती दर्शविली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १५ अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी ४ हजार १६२ जागा रिक्त होत्या. २ हजार २४0 जागा (५३.८२ टक्के) अंतिम फेरी अखेर वाटप झाल्या आहेत. बाटूशी संलग्नित ८ महाविद्यालयात अंतिम फेरीत १ हजार १६५ जागा वाटप झाल्या आहेत. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ८ महाविद्यालयात १ हजार ७५ जागा वाटप झाल्या आहेत.
बाटूने अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मेडिकलप्रमाणे शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मध्ये पॅ्रक्टीकलवर भर दिला आहे. शेवटच्या ८ व्या सेमिस्टरमध्ये कंपनीमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करण्याचे शिक्षण घ्यावे लागते. एखादा विद्यार्थी परीक्षेत जर अनुत्तीर्ण झाला असेल तर अवघ्या १५ दिवसात पुनर्परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा आॅब्जेक्टीव्ह स्वरुपाची असून ती आॅनलाईन घेतली जाते. परीक्षेचा निकाल तत्काळ लागून विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही.
बाटूची डिग्री ही राज्यस्तरावरची असल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. या कारणास्तव सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थी बाटूला पसंती देत आहेत. यंदाच्या वर्षी कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेळवे, पंढरपूरने बाटूशी संलग्नीकरण केले असून प्रथम वर्षाचा प्रवेश देण्यात आला आहे.
बाटूशी संलग्नित महाविद्यालये
- - एन.के. आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर.
- - व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालय, सोरेगाव.
- - ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर.
- - फॅबटेक इनिस्टट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, सांगोला.
- - भगवंत इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, बार्शी.
- - श्रीराम इन्स्टिट्यूट, पानीव, ता. माळशिरस.
- - भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव.
सोलापूर विद्यापीठात बी.ई. ची पदवी मिळते. बाटूमध्ये बी.टेक. ही पदवी मिळते. शिवाय बाटूमध्ये प्रॅक्टिकल शिक्षण जास्त प्रमाणात असून भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. शिवाय राज्यस्तरीय विद्यापीठाची पदवी मिळते म्हणून बाटूला पसंती दर्शविली.
-देवाशिश नागणसुरे,
विद्यार्थी, आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय
प्लेसमेंटसाठी बहुतांश कंपन्या या जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाविद्यालयात येत असतात. एखादा विद्यार्थी जर अनुत्तीर्ण झाला तर त्याला तत्काळ १५ दिवसात परीक्षा देता येते आणि अशा कंपन्यांमध्ये नोकरी मिळवता येते.
जे.बी. दफेदार, प्राचार्य, आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय