शेतात राबताना ‘त्या शेतकऱ्याने’ लिहिली शेतकऱ्यांचं दु:ख मांडणारी इंग्रजी कादंबरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 05:32 AM2018-10-01T05:32:43+5:302018-10-01T05:34:48+5:30
सोलापूरच्या पांडुरंगची किमया : ‘किंग्डम इन ड्रीम’ आंतरराष्ट्रीय पटलावर
प्रसाद पाटील
सोलापूर : अक्षरशत्रू आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या वस्तीवरच्या मुलाने शेतीत राबता -राबता चक्क इंग्रजीतून कादंबरी लिहिण्याची किमया साधली आहे. शेतकऱ्यांच्या दु:खांचे प्रतिबिंब त्याच्या ‘किंग्डम इन ड्रीम... दी प्राइम मिनिस्टर’ या कादंबरीतून उमटले आहे.
पांडुरंग तानाजी मोरे हा पानगावचा (ता. बार्शी ) राहणारा एक जिद्दी तरुण. त्याची ही कादंबरी पॅट्रीएज इंडिया या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे. छापील व ई-बुक स्वरुपातील ही कादंबरी आॅनलाइनही उपलब्ध आहे. आपली पहिली-वहिली कादंबरी पांडुरंगने माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना समर्पित केली आहे. अठरा विशे दारिद्र्यात वाढलेल्या पांडुरंग याने बी.एड. पूर्ण केले. सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीही मिळाली. पण लिखाणाला वेळ मिळेना म्हणून नोकरी सोडून दिली आणि पत्र्याच्या शेडमध्ये गावातच शेतातील कामे करत करत लिखाण सुरू केले.
पहिली कादंबरी प्रकाशित करण्यासाठी पांडुरंगला खूप परिश्रम घ्यावे लागले. मात्र आजही तो शेतात राबतो. आपली नाळ मातीशी जोडलेली राखत त्याचे लिखाण सुरुच आहे. सध्या त्याची इंग्रजीतून ‘व्हाइटमनी’ ही कादंबरी, तसेच ‘दि बर्थ डे गिफ्ट’, ‘हजबंड टेक्स्ट हजबंड ’ व ‘द डार्क अवे’ ही इंग्रजी नाटके, तर ‘लिडरशिप आॅफ सॉ’ व ‘आय आस्क फ्रिडम’ हे कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
जिद्दीनेच मिळाले बळ
शेतातील कुळवणी, पेरणी, खुरपणी, आंतरमशागत, कापणी, काढणी, मळणी याबरोबरच जनावरांचा व्याप हाताळत पांडुरंग लिहीत राहिला. पण शेतमजूर म्हणून कामं करुन फाटक्या प्रपंचाला ठिगळं लावायचा प्रयत्न करणाºया आई-वडिलांच्या दृष्टीने, ‘नोकरी सोडून दिली... अन् कागदं काळी करत बसतोय नुस्ती’ असे बोल त्याला ऐकावे लागले. जिद्दीने त्याला लिखाणाची प्रेरणा मिळत गेली आणि ‘किंगडम इन ड्रीम’ पूर्ण झाली.