ज्जे बात! इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आता जिल्हा परिषद शाळेत; CEO मनिषा आव्हाळेंचा मोठा निर्णय
By Appasaheb.patil | Published: May 30, 2024 05:50 PM2024-05-30T17:50:23+5:302024-05-30T17:50:48+5:30
जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती.
सोलापूर : सीईओ पदाचा पदभार घेतल्यापासून सीईंओ मनिषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेत अनेक आमुलाग्र बदल केले. मागील काही महिन्यात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कार्याचे कौतुक राज्यभर होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा मोठा निर्णय सीईओ आव्हाळे यांनी घेतला आहे. त्यामुळे गावखेड्यातील मुलंही आता इंग्रजी माध्यमाचा अभ्यास शिकणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले. गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत शाळांची पटसंख्या १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते. सद्यस्थितीमध्ये इयत्ता पहिलीचे ७० नोंदणी झालेली आहे. उर्वरित पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात माढा येथे एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेतील वर्ग खोल्या व भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलीचे वसतिगृहामधील विद्यार्थीनीसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सुचना करण्यात आली.शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये शाळा पूर्व तयारी शाळेस सर्व सुविधा व स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेनी शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.